ताज्या बातम्या

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Asias largest Global Capability Center to be set up in Maharashtra


By nisha patil - 12/13/2025 11:20:46 AM
Share This News:



मुंबई, दि.12: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे 6 एकर जागेवर 20 लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार 20 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मोठ्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत जागतिक स्तरावर विश्वास  दृढ झाला आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्याबरोबरच, स्थिर आणि सक्षम वातावरण पुरवण्यास राज्य शासन तत्पर आहे.
सदर प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणार असून, यामध्ये 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच 30,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार  बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी 100 टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून इमारत बाजारातील सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब म्हणूनचे स्थान आणखी मजबूत होणार आहे.
2024 मध्ये ब्रुकफिल्डने पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी ‘बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. याच वर्षी MMRDA सोबत 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. जून 2025 मध्ये कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात 2.1 एकर जागा खरेदी केली आहे.
ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी  अंकुर गुप्ता म्हणाले , “आशिया खंडातील कार्यालय विकास क्षेत्रात नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प आम्ही उभारत आहोत.   मुंबईत करण्यात आलेली गुंतवणूक आता 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. उच्च दर्जाची, शाश्वत आणि आधुनिक कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी ब्रुकफिल्ड कटिबद्ध आहे.”
ब्रुकफिल्ड ही भारतातील सर्वात मोठ्या कार्यालयीन मालक आणि ऑपरेटर कंपन्यांपैकी एक असून देशातील सात शहरांमध्ये सुमारे 55 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचे व्यवस्थापन करते. उच्च दर्जाच्या, ग्रेड-A प्रकल्पांची विकास व संचालन क्षमता कंपनीने सातत्याने सिद्ध केली आहे. पवईतील प्रस्तावित प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, सामाजिक सुविधा व मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.


आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Total Views: 8