ताज्या बातम्या
आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम : महाराष्ट्राची जागतिक यशोगाथा
By nisha patil - 1/22/2026 11:19:16 AM
Share This News:
सौर ऊर्जा कार्यक्रम : महाराष्ट्राची जागतिक यशोगाथा
दावोस :- महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम यशस्वीपणे राबवून ऊर्जा क्षेत्रात नवा इतिहास रचला असून, चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सौर ऊर्जेच्या माध्यमातून १६ गिगावॅट वीज उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेनिमित्त दावोस येथे आयोजित इंडिया पॅव्हेलियनमधील इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या ‘Scaling Solar Energy Where It Matters’ या विशेष सत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने अल्पावधीत ऊर्जा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. राज्यातील केवळ १० टक्के वीज ग्राहक असलेल्या कृषी पंपधारकांकडून एकूण ३० टक्के वीज वापरली जात होती. त्यांना वीज पुरवण्याचा प्रतियुनिट खर्च ८ रुपये होता, मात्र वसुली केवळ १ रुपया केली जात होती. उर्वरित खर्च राज्य सरकार किंवा क्रॉस-सबसिडीच्या माध्यमातून भरावा लागत होता, ज्याचा भार उद्योग आणि घरगुती ग्राहकांवर पडत होता.
ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून शेती क्षेत्राचा वीजभार पूर्णपणे सौर ऊर्जेवर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आशियातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा योजना राबविण्यात आली. प्रत्येक कृषी फिडर स्वतंत्रपणे सौर ऊर्जेवर आणण्यात आला असून, शेतकऱ्यांसाठी वीज वितरणासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
या योजनेतून सुमारे १६ गिगावॅट वीज निर्मिती होणार असून, दरमहा ५०० मेगावॅट क्षमतेची भर पडत आहे. शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठ्याचा खर्च प्रतियुनिट ८ रुपयांवरून आता ३ रुपयांपेक्षा कमी झाला आहे. परिणामी उद्योग व घरगुती ग्राहकांवरील आर्थिक बोजा कमी झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात ‘पीएम सूर्य घर योजना’ प्रभावीपणे राबवली जात असून, त्यातून सुमारे ४ गिगावॅट क्षमतेची रूफटॉप सोलर संयंत्रे कार्यान्वित होणार आहेत. या माध्यमातून घरगुती वापरासोबतच अतिरिक्त वीज ग्रीडला पुरवली जात असून, कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होत आहे.
तसेच ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेअंतर्गत देशात बसवण्यात आलेल्या एकूण सौर पंपांपैकी सुमारे ६० टक्के पंप महाराष्ट्रात आहेत. लवकरच ही संख्या १० लाखांच्या पुढे जाणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षांतील वीजदरवाढीचा वेग कमी झाला असून, वीज खरेदी खर्चात सुमारे १० अब्ज डॉलर्सची बचत अपेक्षित आहे.
सौर ऊर्जा कार्यक्रमामुळे होणारी कार्बन उत्सर्जन कपात ही सुमारे ३०० कोटी झाडे लावण्याइतकी असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०३२ पर्यंत राज्यात आणखी ४५ गिगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य असून, त्यातील ७० टक्के वीज सौर ऊर्जेतून असेल. ग्रीड स्थिरतेसाठी बॅटरी स्टोरेज आणि पश्चिम घाटातील भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेत पंप स्टोरेज प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे. सध्या ८० हजार मेगावॅट क्षमतेचे पंप स्टोरेज प्रकल्प सुरू असून, ही क्षमता लवकरच एक लाख मेगावॅटपर्यंत वाढवली जाणार आहे.
आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम : महाराष्ट्राची जागतिक यशोगाथा
|