बातम्या
अॅड. असीम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द — बार कौन्सिलचा कठोर निर्णय
By nisha patil - 3/11/2025 3:20:11 PM
Share This News:
अॅड. असीम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द — महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा कठोर निर्णय
पुण्याचे प्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर बार कौन्सिलने मोठी कारवाई करत त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने घेतलेल्या या निर्णयामुळे सरोदे पुढील तीन महिने न्यायालयीन कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.
अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिस्तभंगात्मक कारवाई केली. समितीने सरोदे यांचे भाषण, त्याचे ट्रान्सक्रिप्ट आणि संबंधित व्हिडिओ तपासल्यानंतर असा निष्कर्ष काढला की त्यांनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविषयी केलेली विधाने आक्षेपार्ह व अशोभनीय होती.
असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात “राज्यपाल फालतू आहेत” आणि “न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे” अशी विधाने केली होती. या वक्तव्यामुळे न्यायसंस्थेबद्दल अविश्वास निर्माण होतो आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानाला तडा जातो, असे बार कौन्सिलने स्पष्ट केले.
तक्रारदाराने सरोदे यांना 19 मार्च 2024 रोजी लेखी माफी मागण्याची संधी दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. त्यानंतर बार कौन्सिलच्या समितीने त्यांच्या वर्तनाला “गैरजबाबदार आणि वकिलीच्या आचारसंहितेचा भंग करणारे” ठरवत सनद तीन महिन्यांसाठी निलंबित केली.
दरम्यान, असीम सरोदे यांनी आपल्या बाजूने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा अथवा राज्यपालांचा अपमान केलेला नाही. माझे वक्तव्य हे लोकशाहीतील रचनात्मक टीका होती. ‘फालतू’ हा शब्द मी सामान्य भाषेत वापरला असून तो अपमानार्थ नव्हता. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे.”
सध्या असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना गटप्रकरणातील सुनावणीमध्ये वकील म्हणून कार्यरत होते. मात्र, सनद रद्द झाल्याने त्यांना या कालावधीत न्यायालयात वकिली करता येणार नाही.
अॅड. असीम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द — बार कौन्सिलचा कठोर निर्णय
|