बातम्या
"देव मामा यांच्या हस्ते रेणुका मातेच्या नव्या मंदिराचा मंगलमय सोहळा"
By nisha patil - 8/14/2025 6:04:31 PM
Share This News:
"देव मामा यांच्या हस्ते रेणुका मातेच्या नव्या मंदिराचा मंगलमय सोहळा"
अक्कोळ (कर्नाटक) : अक्कोळ गावच्या मध्यवर्ती भागात तब्बल २५ वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरलेले रेणुका मातेचे जुने मंदिर आज नव्या वैभवात सजले आहे. या मंदिराची अखंड सेवा व जतन करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे, रेणुका मातेचे निस्सीम भक्त आणि रेणुका देवस्थान समितीचे सर्वेसर्वा महादेव पुणेकर उर्फ देव मामा हे परिसरात भक्ती, सेवा आणि उदार मनाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने असंख्य भाविकांचे कल्याण झाले असून, त्यांचे नाव पंचक्रोशीत आदराने घेतले जाते.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेले मंदिराचे नूतनीकरण कार्य पूर्णत्वास पोहोचले असून, नव्या मंदिरातील देवीची प्रतिष्ठापना स्वतः देव मामा यांच्या शुभहस्ते मंगलमय वातावरणात पार पडली. देवीच्या जयघोषात, वादन-भजनाच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा अक्कोळ गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा ठरला.
याप्रसंगी संजीवनी खुडे, हिंदू भोसले, महादेव नाईक, प्रकाश पुणेकर यांनी भक्तीपूर्ण गायन सादर करून वातावरण अधिकच भावमय केले. सोहळ्यानंतर उपस्थित हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि मंदिराच्या नव्या स्वरूपाचा आनंद अनुभवला.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र पत्रकार समितीचे अध्यक्ष विकास पुणेकर, शिवाजी पुणेकर, संजय बरगाले, बाशा खलिफा, मारता भोसले, रावसाहेब पुणेकर, अभिजीत पुणेकर, लक्ष्मण पुणेकर, संपत सावंत यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते. कार्यक्रमात देव मामा यांच्या सेवाभावी कार्याचा विशेष गौरव करण्यात आला आणि त्यांच्या अखंड श्रद्धा व समर्पणाचा प्रत्यय सर्वांना आला.
या भव्य प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे अक्कोळ गावासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांना एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव लाभला, जो पुढील अनेक वर्षे त्यांच्या हृदयात दरवळत राहील.
"देव मामा यांच्या हस्ते रेणुका मातेच्या नव्या मंदिराचा मंगलमय सोहळा"
|