बातम्या
उंचगावात शिवकालीन वैभवाचा जागर! ४० मंडळांनी उभारले गड-किल्ले
By nisha patil - 11/23/2026 3:40:41 PM
Share This News:
उंचगावात शिवकालीन वैभवाचा जागर! ४० मंडळांनी उभारले गड-किल्ले
उंचगावमध्ये शिवकालीन इतिहासाचा जागर घडवणाऱ्या भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत तब्बल ४० मंडळांनी सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक मंडळाने मेहनत आणि कलाकौशल्याच्या जोरावर वैशिष्ट्यपूर्ण गड-किल्ले साकारल्याने स्पर्धेत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून देण्यात आले.
या स्पर्धेत शिवशक्ती तालीम मंडळ यादववाडी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. तर जय शिवराय तालीम मंडळ रेडकर गल्ली आणि दर्शता मोरे ग्रुप यांनी विभागून द्वितीय क्रमांक मिळवला. ऋषिकेश जाधव-विराज देशमुख मोळे कॉलनी ग्रुप आणि कृष्णराज राहुल म्हसवेकर ग्रुप यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला. सार्थक भोगम ग्रुपला उत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बोलताना राजू यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला सरपंच मधुकर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उंचगावात शिवकालीन वैभवाचा जागर! ४० मंडळांनी उभारले गड-किल्ले
|