बातम्या
गोरगरिबांना ठेच लागली तरी नगरसेवकांना कळ येईल असे ऋणानुबंध निर्माण करू
By nisha patil - 10/1/2026 10:31:54 PM
Share This News:
गोरगरिबांना ठेच लागली तरी नगरसेवकांना कळ येईल असे ऋणानुबंध निर्माण करू
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
कोल्हापूर, दि. १० : लोकप्रतिनिधी आणि जनता यांचे नाते हे केवळ राजकीय नसून जीवाभावाचे असले पाहिजे. गोरगरिबांना ठेच जरी लागली तरी तिची वेदना आमच्या नगरसेवकांना कळली पाहिजे, असे ऋणानुबंध महायुतीचे सर्वच नगरसेवक निर्माण करतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ यादवनगर, जवाहरनगर, प्रतिभानगर आणि राजेंद्रनगर येथे झालेल्या जाहीर प्रचारसभांमध्ये ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, गरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचार घेणे अधिक सोयीचे वाटते. ही बाब लक्षात घेऊनच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे संपूर्ण स्वरूप बदलण्यात आले आहे. ही आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महायुतीला पाठिंबा देणे गरजेचे आहे.
ते म्हणाले, शहरातील रस्ते, गटारी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सीसीटीव्ही यंत्रणा, स्वच्छतागृहांची उभारणी यासह अंबाबाई व जोतिबा विकास आराखडा, यात्रेकरूंसाठी निवास व्यवस्था, हॉटेल्स, भाडेतत्त्वावर फ्लॅट्स आणि पार्किंग सुविधा सक्षम करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी फक्त महायुतीच्या माध्यमातूनच उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळेच कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा मिळतील आणि शहराच्या दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.
यावेळी आमदार अमल महाडिक म्हणाले की, या प्रभागातील बहुतांश प्रॉपर्टी कार्डधारकांचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. जे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत, ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने निश्चितच मार्गी लावले जातील. महायुतीचा जाहीरनामा हा केवळ आश्वासनांचा नसून कर्तव्यनामा आहे. विरोधकांनी एवढे काम केले असते, तर त्यांना जाहीरनामा काढण्याची गरजच पडली नसती, अशी टीकाही त्यांनी केली.
शेंडा पार्क येथे साकारत असलेले ११०० बेड्सचे रुग्णालय हे महायुतीच्या विकासकामांचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत आमदार महाडिक म्हणाले की, या रुग्णालयात हजारो गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार होणार असून, किरकोळ आजारांसाठीही आता पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही.
यावेळी विजय जाधव आणि विजय काळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
दरम्यान, मंत्री मुश्रीफ यांनी महायुतीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून वृद्ध, निराधार, दिव्यांगांसाठी पेन्शन योजना, बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, बेघरांसाठी पक्की घरे तसेच विविध आरोग्यविषयक योजना घराघरापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
गोरगरिबांना ठेच लागली तरी नगरसेवकांना कळ येईल असे ऋणानुबंध निर्माण करू
|