राजकीय
भाजपच्या युवा, महिला व ओबीसी मोर्चाची स्थानिक निवडणुकीसाठी सज्जता जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील : “मोर्चा, आघाडी व प्रकोष्ठ हे पक्षाचे कान-नाक-डोळे”
By nisha patil - 10/11/2025 12:02:49 PM
Share This News:
कोल्हापूर | दिनांक 10 नोव्हेंबर
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा, महिला मोर्चा आणि ओबीसी मोर्चा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या तिन्ही मोर्चांनी आपल्या कामाचा ठसा उमटवावा, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले.
ते कोल्हापूर येथे आयोजित भाजप युवा, महिला आणि ओबीसी मोर्चा जिल्हा पदाधिकारी निवड कार्यक्रमात बोलत होते.
नाथाजी पाटील म्हणाले, “भाजपच्या विविध मोर्चा, आघाड्या आणि प्रकोष्ठांचे पदाधिकारी हे पक्षाचे कान, नाक आणि डोळे आहेत. पक्षाचा डोलारा या सर्वांवर अवलंबून असतो. या सर्वांनी केलेले कार्य हे पक्षाच्या मुख्य प्रवासासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे प्रत्येक मोर्चाने आपले वेगळेपण दाखवावे.”
कार्यक्रमात महिला मोर्चा, युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चा यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमात श्री. शिवाजी बुवा यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मोर्चा व आघाड्यांची भूमिका स्पष्ट केली, तर जिल्हा सरचिटणीस सुशीला पाटील यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वदेशी जागरण अभियान’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी गडहिंग्लजच्या माजी सभापती जयश्री तेली, आजऱ्याच्या माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, कागलच्या माजी नगरसेविका विजया निंबाळकर, तसेच धीरज करलकर, रेखा नांगरे पाटील, अर्जुन पाटील, रणजीत आडके, नितेश कोरी, सचिन देसाई, ऐश्वर्या पुजारी, सुजाता थडके आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मेघा राणी जाधव यांनी केले. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रवीश पाटील कौलकर यांनी प्रास्ताविक केले, तर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार यांनी आभार मानले.
भाजपच्या युवा, महिला व ओबीसी मोर्चाची स्थानिक निवडणुकीसाठी सज्जता जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील : “मोर्चा, आघाडी व प्रकोष्ठ हे पक्षाचे कान-नाक-डोळे”
|