ताज्या बातम्या

बीएसएनएलकडून देशभर ‘वाय-फाय कॉल’ सुविधा सुरू

BSNL launches WiFi Call facility across the country


By nisha patil - 2/1/2026 3:02:35 PM
Share This News:



नवी दिल्ली :- सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने देशभरातील ग्राहकांसाठी वाय-फाय आधारित कॉलिंग सेवा कार्यान्वित केली आहे. या सुविधेमुळे ग्रामीण, डोंगराळ आणि दुर्गम भागांमध्ये मोबाईल सिग्नल नसतानाही ग्राहकांना अखंड संवाद साधता येणार आहे.

या सेवेद्वारे ग्राहक वाय-फाय इंटरनेटच्या सहाय्याने थेट फोन कॉल करू शकतील तसेच संदेश पाठवू शकतील. मोबाईल टॉवरचे नेटवर्क उपलब्ध नसलेल्या भागांतही स्पष्ट आवाजात संवाद साधता येणार असल्याने ही सेवा विशेषतः ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या सुविधेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती बीएसएनएलने दिली आहे.

बीएसएनएलच्या मते, ही सेवा नेटवर्क आधुनिकीकरणाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असून, कमी सुविधा असलेल्या भागांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘वाय-फाय कॉलिंग’ हा पर्याय सुरू करणे आवश्यक असून, फोन सुसंगततेबाबत किंवा तांत्रिक मदतीसाठी जवळच्या बीएसएनएल सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

5G सेवेसाठी बीएसएनएल सज्ज

दरम्यान, बीएसएनएलकडून 5G सेवा सुरू करण्याच्या दिशेने हालचाली वेगात सुरू आहेत. कंपनीने 5G संदर्भातील पथदर्शी प्रकल्प पूर्ण केला असून, 4G नेटवर्क सुधारण्यासाठी घेतलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. या सुधारणांमुळे नेटवर्कचा वेग आणि सेवा गुणवत्ता अधिक चांगली होणार आहे.

बीएसएनएलची 5G सेवा प्रत्यक्षात आली, तर दूरसंचार क्षेत्रात नव्या स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बीएसएनएलकडून देशभर ‘वाय-फाय कॉल’ सुविधा सुरू
Total Views: 38