ताज्या बातम्या
🛰️ शत्रूच्या हालचालींवर सूक्ष्म नजर! ‘बाहुबली’ रॉकेटने नौदलाचा वजनदार उपग्रह अवकाशात
By nisha patil - 3/11/2025 11:21:16 AM
Share This News:
श्रीहरीकोटा, दि. २ : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने आज भारतीय नौदलासाठी तयार केलेल्या आतापर्यंतच्या सर्वांत वजनदार ‘सीएमएस-०३’ या ४,४१० किलो वजनाच्या दूरसंवाद उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोच्या ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलव्हीएम-३ एम ५ रॉकेटद्वारे सतीश धवन अवकाश केंद्रातून सायंकाळी ५.२६ वाजता हा उपग्रह अवकाशात झेपावला.
या उपग्रहामुळे हिंद महासागर प्रदेशात शत्रूंच्या हालचालींवर सूक्ष्म आणि सतत नजर ठेवणे शक्य होणार आहे. ‘सीएमएस-०३’ उपग्रहाच्या साहाय्याने नौदलाच्या जहाजे, पाणबुड्या आणि विमाने यांच्यात आवाज, व्हिडिओ आणि डेटा यांसारखा सुरक्षित संवाद साधता येईल. आणीबाणीच्या प्रसंगी लष्करी कारवाईत तसेच दुर्गम भागातील संपर्कासाठीही हा उपग्रह उपयोगी ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रक्षेपणाचे स्वागत करताना म्हटले, “सीएमएस-०३ हा भारताच्या समुद्री सुरक्षेकडे टाकलेले ऐतिहासिक पाऊल असून आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.”
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले की, “४,४१० किलोग्रॅमचा हा उपग्रह अत्यंत अचूकपणे नियोजित कक्षेत स्थापित करण्यात आला आहे.”
मुख्य वैशिष्ट्ये :
• 🌊 व्याप्ती: संपूर्ण हिंद महासागर प्रदेशात स्थिर व मजबूत सिग्नल
• 📡 हाय बँडविड्थ कनेक्टिव्हिटी: जहाजांपासून नियंत्रण केंद्रांपर्यंत अखंड व सुरक्षित डेटा ट्रान्सफर
• 🔒 सुरक्षित संवाद: व्हॉइस, डेटा आणि व्हिडिओसाठी विविध बँड्सवर सक्षम ट्रान्सपॉन्डर्स
🛰️ शत्रूच्या हालचालींवर सूक्ष्म नजर! ‘बाहुबली’ रॉकेटने नौदलाचा वजनदार उपग्रह अवकाशात
|