शैक्षणिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महापरिनिर्वाण दिन विशेष

Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day Special


By nisha patil - 6/12/2025 11:26:36 AM
Share This News:



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगाने विश्वरत्न म्हणून केली आहे. त्यांच्या विचारांनी, कार्याने आणि अथक संघर्षाने करोडो लोकांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आणि मानवमुक्तीचा प्रकाश पसरला.

भीमराव ते भारतरत्न हा त्यांचा प्रवास अद्भुत आणि प्रेरणादायी आहे. जातअवमान, सामाजिक विषमता आणि मानवी हक्क नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा त्यांचा लढा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. परंतु अचाट बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी समाजमन परिवर्तन घडविले.

उच्चविद्याविभूषित बॅरिस्टर बाबासाहेब हे भारताचे पहिले अर्थतज्ञ. देश-विदेशातील उच्च शिक्षणातून प्राप्त केलेल्या पदव्या आणि सखोल बहुविषयक ज्ञानाचा उपयोग त्यांनी दलित, वंचित, शेतकरी, कामगार, महिला आणि देशातील शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी केला.

नेतृत्व कसे असावे याचा जगासाठी आदर्श म्हणजे डॉ. आंबेडकर. वाचन, चिंतन आणि अभ्यास ही त्यांची जीवनपद्धती होती. रोज बारा तास वाचन करणारे हे ज्ञानतपस्वी आपल्या विशाल वाचनालयातील पन्नास हजार पुस्तकांच्या आधारे जगाला नवे विचार देणारे विद्वान ठरले.

शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचे साधन आहे, हे त्यांनी समाजात खोलवर बिंबविले.
प्रज्ञा-शील-करुणा या मूल्यांनी घडलेली समाजरचना हेच त्यांचे स्वप्न.

भारतातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाचे, समानतेचे आणि सुरक्षिततेचे कवच देणारी भारतीय राज्यघटना हे त्यांचे युगप्रवर्तक कार्य. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा पाया त्यांनी लोकशाहीला दिला. म्हणूनच ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महामानव ठरले.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महापरिनिर्वाण दिन विशेष
Total Views: 16