बातम्या
वन्यप्राणी समस्या निवारणासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे टप्प्याटप्प्याने आंदोलन
By nisha patil - 8/25/2025 4:43:50 PM
Share This News:
वन्यप्राणी समस्या निवारणासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे टप्प्याटप्प्याने आंदोलन
"एक लाख सह्यांचे" निवेदन जिल्हाधिकारी व मंत्र्यांना देणार
आजरा (हसन तकीलदार): विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड आणि महामार्गांचे जाळे यामुळे वन्यप्राण्यांचा वावर थेट शेतात आणि शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. या समस्येमुळे शेतकरी पुरते त्रस्त झाले असून, वाहनधारकांनाही अपघातांमध्ये जीवितहानी व नुकसान सहन करावे लागत आहे. यावर शासनाने अद्याप ठोस पावले न उचलल्याने बहुजन मुक्ती पार्टीने "एक लाख सह्यांचे" निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी दिली.
वन्यप्राणी समस्येवर उपाययोजना न झाल्याने मागील काही महिन्यांपासून बहुजन मुक्ती पार्टीकडून शृंखलाबद्ध आंदोलने सुरू आहेत. 3 फेब्रुवारी, 16 मे, 30 मे आणि 26 जून 2025 रोजी पत्रव्यवहार व बैठका घेऊनही शासनाने ठोस कारवाई न केल्याने 1 जुलै रोजी आजरा बंदची हाक देण्यात आली होती.
आता या प्रश्नावर जनतेचा दबाव वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा वनसंरक्षक, वनमंत्री व पालकमंत्री यांना एक लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या कागदांची व्यवस्था काही दानशूर व्यक्तींनी केली आहे.
बहुजन मुक्ती पार्टी संविधानिक मार्गानेच लढा देत असून इतर प्रश्नांप्रमाणेच वन्यप्राणी प्रश्नही यशस्वीपणे मार्गी लागेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, अमित सुळेकर, ऍड. विद्या त्रिरत्ने, शरद कुंभार, नितीन राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
वन्यप्राणी समस्या निवारणासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे टप्प्याटप्प्याने आंदोलन
|