बातम्या

पन्हाळगडावर भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांची पसंती

Bappa bid farewell amidst a devotional atmosphere


By nisha patil - 9/19/2026 7:16:27 PM
Share This News:



पन्हाळगडावर भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांची पसंती

पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर पन्हाळा परिसरात घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन भक्तिभाव, उत्साह आणि शांततेच्या वातावरणात पार पडले. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने निमजगामाळ, खोकड तलाव रस्ता परिसरातील विहिरीत गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
         

यंदा नगरपरिषदेने केलेल्या पर्यावरणपूरक विसर्जनाच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गडावरील इतर तलावामध्ये गणपती विसर्जित न करता नागरिकांनी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन व्यवस्थेचा वापर करण्यास अनेक कुटुंबांनी प्राधान्य दिले.
       

पन्हाळा शहरासह बुधवार पेठ, नेबापूर, मंगळवार पेठ आणि सोमवार पेठ परिसरातील नागरिकांनीही गडावर येऊन गणेशमूर्तींचे विसर्जन केले. नगरपरिषदेने विसर्जन कुंडासोबतच निर्माल्य संकलनाची व्यवस्था केल्याने भाविकांची मोठी सोय झाली.
         

 विसर्जनस्थळी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कर्णकर्कश डीजेला फाटा देत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन सोहळा पार पडला.
         

पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करून नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासोबतच धार्मिक परंपरा जपण्याचा संदेश दिला. नगरपरिषदेच्या नियोजनामुळे विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली.


पन्हाळगडावर भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप; पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांची पसंती
Total Views: 146