राजकीय
तंत्र-मंत्रातून निवडून आलेल्या ३०% नगरसेवकांपासून सावध राहा; शिवसेनेचा महापौरांना इशारा
By Administrator - 2/3/2026 5:59:45 PM
Share This News:
तंत्र-मंत्रातून निवडून आलेल्या ३०% नगरसेवकांपासून सावध राहा; शिवसेनेचा महापौरांना इशारा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्या लोकप्रतिनिधी मंडळाच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या वतीने महापौरांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे काही नगरसेवकांवर गंभीर आरोप करत, प्रशासनात गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, अनेक वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक पार पडून लोकप्रतिनिधी मंडळ अस्तित्वात आले. मात्र सत्तेच्या राजकारणात तंत्र-मंत्र आणि विशेषतः ‘यंत्र’ यांच्या माध्यमातून सुमारे ३० टक्के लोकप्रतिनिधी विराजमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. खंडणी, हप्ते, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच टीडीआर व्यवहारांशी संबंधित नगरसेवक महापालिकेत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशावर डल्ला मारणाऱ्या प्रवृत्तींपासून शहराची अब्रू वाचवण्याची जबाबदारी महापौरांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जयप्रभा स्टुडिओसह शासकीय जमिनी, फ्लॅट, प्लॉट आदी प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
शिवसेनेने स्पष्ट केले आहे की, चांगल्या कामांना पाठिंबा देताना वाईट प्रवृत्तींचा कडवा प्रतिकार करण्याची पक्षाची परंपरा आहे. महापौरांनी सर्वधर्म व सर्वपक्षीय भावनेतून जनतेच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले, शहरप्रमुख सुनील मोदी, उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे, महिला जिल्हा संघटीका प्रतिज्ञा उत्तुरे व महिला शहर संघटीका रिमा देशपांडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तंत्र-मंत्रातून निवडून आलेल्या ३०% नगरसेवकांपासून सावध राहा; शिवसेनेचा महापौरांना इशारा
|