बातम्या

स्मार्ट मीटरचे फायदे पटले, गडहिंग्लज विभागात स्मार्ट मीटर बसले!

Benefits of smart meters recognized


By nisha patil - 10/15/2026 11:01:29 PM
Share This News:



स्मार्ट मीटरचे फायदे पटले, गडहिंग्लज विभागात स्मार्ट मीटर बसले!

१०० टक्के स्मार्ट मीटर बसवत गडहिंग्लज विभाग राज्यात प्रथम

कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : स्मार्ट मीटरविषयी जनजागृती, ग्राहकांच्या शंकांचे निरसन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून १०० टक्के स्मार्ट मीटर बसवत गडहिंग्लज विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुरुवातीच्या गैरसमजांवर संवादाने मात करत गडहिंग्लज विभागाने एक लाख ५५ हजार १८९ स्मार्ट मीटर बसविण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कोल्हापूरच्या या कामगिरीचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

     गडहिंग्लज विभागात ऑगस्ट २०२४ रोजी पहिला स्मार्ट मीटर बसवून मोहिमेला सुरुवात झाली. गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि नेसरी या चार उपविभागांत टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. चंदगड उपविभागात ४८ हजार ३८६, गडहिंग्लज उपविभागात ४२ हजार ३४०, आजरा उपविभागात ३७ हजार १६९, तर नेसरी उपविभागात २७ हजार २९४ स्मार्ट मीटर बसविण्यात आले. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या या सर्व वीज ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतील वीज वापरावर प्रती युनिट ८५ पैसे सूट मिळत आहे.

संवादामुळेच शक्य झाला बदल – मुख्य अभियंता स्वप्नील काटकर

गडहिंग्लज विभागाने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने काम करत लक्षणीय प्रगती साधली. प्रत्येक गावात सिरीजमध्ये १० जुने मीटर बसवण्यात आले. गडहिंग्लज विभागातील सर्व अभियंते, कर्मचारी तसेच जनमित्रांनी ग्राहकांना स्मार्ट मीटरचे कार्य, त्याचे फायदे याची माहिती देत त्यांच्या मनातील शंका व गैरसमज दूर केले. स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोठ्याप्रमाणात घेण्यात आलेले मेळावे, जनजागृती कार्यक्रम आणि ग्रामसभांच्या माध्यमातून थेट संवाद साधण्यात आला. कोल्हापूर परिमंडलातील सर्वच वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरविषयी सत्यता समजून घेऊन मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले.

सर्वांच्या सहकार्यामुळे कामास यश -  अधीक्षक अभियंता गणपत लटपटे

गडहिंग्लज विभागात १०० टक्के स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हे संबंधित अभियंते, अधिकारी, जनमित्र व प्रामुख्याने वीज ग्राहकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. स्मार्ट मीटरच्या फायद्यांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात आल्याने मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच जिल्ह्यातील आणखी दोन विभागात सर्व वीज ग्राहकांना १०० टक्के स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिली. 


स्मार्ट मीटरचे फायदे पटले, गडहिंग्लज विभागात स्मार्ट मीटर बसले!
Total Views: 5