बातम्या
निवडणुकीच्या तोंडावर भानामती–करणी प्रकरण उघडकीस; नागरिकांत भीती, राजकारणात खळबळ
By nisha patil - 10/11/2025 5:32:22 PM
Share This News:
निवडणुकीच्या तोंडावर भानामती–करणी प्रकरण उघडकीस; नागरिकांत भीती, राजकारणात खळबळ
कुरुंदवाड | प्रतिनिधी रविवारी सकाळी कुरुंदवाड शहरात भानामती आणि करणी-जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील विविध वेशींवर आणि चौकांत कापडात गुंडाळलेले संशयास्पद साहित्य नागरिकांच्या निदर्शनास आले.
या कापडांमध्ये माती, हळद-कुंकू, तांदूळ, भिजवलेला हरभरा, खाऊची पाने, काळा दोरा आणि विविध साहित्य आढळून आले. विशेष म्हणजे, शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी असे साहित्य सापडल्याने नागरिकांत भीतीचे तसेच चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सोमवारपासून नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार असतानाच हा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. काही नागरिक आणि इच्छुक उमेदवारांनी या प्रकाराला राजकीय हेतूने पसरवलेली अंधश्रद्धा व मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न असे म्हटले आहे.
यापूर्वीही तीन महिन्यांपूर्वी शिरढोण रस्त्यावर अशाच स्वरूपाचा प्रकार घडला होता. त्या वेळी नगरपालिकेतील 20 नगरसेवकांच्या संख्येनुसार 20 बाहुल्यांचा भानामतीचा उतारा आढळला होता. पोलीसांनी तपास केला, मात्र कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता.
या नव्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी हे राजकीय कटकारस्थान असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावरही दिवसभर या घटनेचीच चर्चा रंगली होती.
निवडणुकीच्या तोंडावर भानामती–करणी प्रकरण उघडकीस; नागरिकांत भीती, राजकारणात खळबळ
|