विशेष बातम्या

लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व २०२६’

Bharat Parv 2026 to be held in the courtyard of the Red Fort


By nisha patil - 1/25/2026 12:10:21 PM
Share This News:



भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे २६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात ‘भारत पर्व २०२६’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश असून, २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ आणि २७ ते ३१ जानेवारीदरम्यान दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.

या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य दालन उभारण्यात येणार असून, याद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटनपरंपरेचे, सांस्कृतिक वैभवाचे आणि ऐतिहासिक वारशाचे प्रभावी दर्शन घडविण्यात येणार आहे.

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनात सहभागी झालेला महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ – ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भर भारताचे प्रतीक’. हा चित्ररथ लाल किल्ला परिसरात विशेष स्थानी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा लाडका उत्सव असलेला गणेशोत्सव हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून, तो स्थानिक कलाकार, मूर्तिकार, कारागीर आणि लघुउद्योगांना आर्थिक बळ देणारा एक महत्त्वाचा सामाजिक व आर्थिक उपक्रम असल्याचे प्रभावी चित्रण या चित्ररथातून साकारण्यात आले आहे.

MTDC च्या दालनामध्ये पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे, कोकणातील निसर्गरम्य किनारपट्टी, ऐतिहासिक गड-किल्ले, अध्यात्मिक वारसा तसेच व्याघ्र प्रकल्पांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील विविध पर्यटन केंद्रांवरील निवास सुविधा आणि आकर्षक पर्यटन पॅकेजेसबाबत मार्गदर्शनासाठी स्वतंत्र माहिती कक्षही कार्यरत असणार आहे.

महोत्सवात **‘पॅन इंडिया फूड कोर्ट’**च्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच हस्तशिल्प व हातमाग बाजारात विणकर आणि कारागीरांनी साकारलेल्या कलाकुसरीच्या वस्तू खरेदीसाठी उपलब्ध असतील.

सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, सशस्त्र दलांचे बँड वादन, तसेच ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेवरील विशेष प्रदर्शन अशा विविध उपक्रमांची रेलचेल अनुभवता येणार आहे.


लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व २०२६’
Total Views: 21