राजकीय
शेतकऱ्यांना दिलासा! 9 नद्यांवरील उपसा बंदी तीन दिवसांसाठी शिथिल
By nisha patil - 6/17/2026 10:38:01 AM
Share This News:
कोल्हापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पाटबंधारे विभागाने दूधगंगा नदी वगळता इतर नद्यांवरील उपसा बंदी 17 जून ते 19 जून या कालावधीत शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
15 जून रोजी इरिगेशन फेडरेशन आणि लाभधारक शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. दूधगंगा धरण वगळता इतर धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्याची मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली होती.
या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने तीन दिवसांसाठी उपसा बंदी शिथिल करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, 20 जून रोजी धरणांतील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाणार आहे.
पाटबंधारे विभागाने औद्योगिक व बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांना नदीपात्रात सांडपाणी किंवा दूषित पाणी सोडू नये, असे आवाहन केले आहे. मर्यादित पाणीसाठा आणि प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.
खरीप हंगामाआधी दिलासा; 17 ते 19 जूनदरम्यान उपसा बंदी उठवली
|