राजकीय

कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का – माजी नगरसेवकांसह १६ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Big blow to Congress in Kolhapur


By nisha patil - 7/15/2025 4:47:50 PM
Share This News:



 मुंबई:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात भाजपने मोठा राजकीय झटका दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे, संताजी घोरपडे, प्रसाद जाधव यांच्यासह एकूण १६ प्रमुख कार्यकर्त्यांनी आज मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, सुधीर गाडगिळ आदींच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते भाजपकडे वळत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची ओळख करून देताना, "महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद अधिक मजबूत झाली आहे," असे वक्तव्य केले. तर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी "पक्षाची ध्येयधोरणे समजून घ्या आणि जनहिताच्या कामात पुढे रहा," असे आवाहन नवीन कार्यकर्त्यांना केले.

या प्रवेशामुळे कोल्हापुरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून, भाजपच्या विजयाच्या शक्यता अधिक मजबूत झाल्या आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची नावे:

माजी नगरसेवक दिलीप पवार व सरस्वती पवार

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे

अभिषेक बोंद्रे (माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू)

संताजीबाबा घोरपडे (माजी विधानसभा उमेदवार)

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव

रिक्षा संघटनेचे नेते राजेंद्र थोरवडे

वैभव राजेभोसले, सुशांत सावंत, अभिजीत माने, दीपक खांडेकर

मंदार राऊत, संकेत रुद्र, विलास इंदप, देवेश कुबल, सुदर्शन वोरा


भाजपच्या या इनकमिंगमुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हं आहेत.


कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का – माजी नगरसेवकांसह १६ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Total Views: 2174