बातम्या
📰 मिरजेत कोटींच्या बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; कोल्हापूरचा पोलीस हवालदार मुख्य सुत्रधार!
By nisha patil - 11/10/2025 12:48:38 PM
Share This News:
मिरज :- मिरज पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.
या प्रकरणात कोल्हापूर पोलिस दलातील एक हवालदार आणि त्याचे चार साथीदार असे पाच जण अटक करण्यात आले आहेत.
पोलिसांनी ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटांसह, कलर झेरॉक्स मशीन, प्रिंटर, स्कॅनर, नोटा मोजण्याचे मशीन आणि वाहन असा एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरजेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बनावट नोटांच्या प्रकरणात पश्चिम महाराष्ट्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचेही त्यांनी सांगितले. तपासात उघड झाले की, मुख्य सुत्रधार इब्रार आदम इनामदार (वय ४४, कसबा बावडा, कोल्हापूर) हा कोल्हापूर पोलिस दलात वाहनचालक म्हणून कार्यरत आहे.
त्याच्या ‘सिद्धकला चहा’ या दुकानातून या बनावट नोटांची छपाई केली जात होती.
इनामदार सोबत सुप्रीत काडापा देसाई (गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (कोरोची), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (राजारामपुरी, कोल्हापूर) आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे (मालाड, मुंबई) या चार जणांनाही अटक करण्यात आली आहे.
सर्व आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
८ ऑक्टोबर रोजी मिरजेत नीलजी-बामणी परिसरातील पुलाखाली एकजण बनावट नोटांची विक्री करणार असल्याची माहिती गांधी चौक पोलिसांना मिळाली.
सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून सुप्रीत देसाई याला ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह पकडले.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी इनामदारच्या दुकानावर छापा टाकून संपूर्ण साहित्य जप्त केले.
या टोळीमार्फत इब्रार इनामदार बनावट नोटा वितरणाचे काम करत होता.
५०० रुपयांच्या एका खऱ्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्याचा व्यवहार सुरू असल्याचं समोर आलं आहे.
सुप्रीत देसाई मिरजेत या नोटा कोणाला देणार होता, याचाही तपास सुरू आहे.
या कारवाईसाठी गांधी चौक पोलिस पथकाला पारितोषिक देण्यात येणार असल्याचं पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं.
तसंच, या रॅकेटचा संपूर्ण नेटवर्क शोधून ‘पाळीमुळे खडून काढलं जाईल’ असाही इशारा त्यांनी दिला.
या प्रकरणात अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, आणि सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते.
📰 मिरजेत कोटींच्या बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; कोल्हापूरचा पोलीस हवालदार मुख्य सुत्रधार!
|