आरोग्य
🔹 दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी मोठा निर्णय
By nisha patil - 12/21/2025 11:21:06 AM
Share This News:
मुंबई : राज्यातील दुर्गम, आदिवासी तसेच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘ब’ संवर्गात कार्यरत असलेल्या 190 वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट ‘अ’ संवर्गातील रिक्त पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे.
विशेषतः आदिवासी व दुर्गम भागात आरोग्य सेवेची उपलब्धता व गुणवत्ता सुधारण्यास या निर्णयामुळे चालना मिळणार आहे. दीर्घकाळ पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढून, आरोग्य सेवांवर सकारात्मक परिणाम दिसून येईल, अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
या निर्णयानुसार महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-ब (वेतनस्तर S-16 : ₹44,900 – 1,42,400) मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ (वेतनस्तर S-20 : ₹56,100 – 1,77,500) या संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, त्यातील अटी व शर्तींच्या अधीन राहून संबंधित अधिकाऱ्यांना नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
समुपदेशनाद्वारे पदोन्नती देण्याचा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा हा निर्णय वैद्यकीय अधिकारी संवर्गात समाधानकारक ठरला असून, आरोग्य विभागातील एक महत्त्वाचा प्रशासकीय प्रश्न मार्गी लागल्याचे मानले जात आहे. विशेषतः आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
ही समुपदेशन प्रक्रिया आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव दी. नी. केंद्रे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अवर सचिव वसंत गायकवाड, सहसंचालक राजेंद्र भालेराव तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे राबविण्यात आली.
🔹 दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी मोठा निर्णय
|