विशेष बातम्या

🌍 विज्ञानातील मोठा शोध : १५ कोटी वर्षांपूर्वीच्या वादळात दोन उडणारे डायनासोर बळी

Big discovery in science


By nisha patil - 12/9/2025 1:28:40 PM
Share This News:



🌍 विज्ञानातील मोठा शोध : १५ कोटी वर्षांपूर्वीच्या वादळात दोन उडणारे डायनासोर बळी

बर्लिन : जर्मनीमध्ये सापडलेल्या दुर्मिळ जीवाश्मांमधून १५ कोटी वर्षांपूर्वीच्या ज्युरासिक काळातील आश्चर्यकारक घटना उलगडली आहे. संशोधनानुसार, दोन लहान व उडणारे डायनासोर (टेरोसॉर) वादळात अडकून मृत्युमुखी पडले होते.

संशोधकांनी या जीवाश्मांची तपासणी (नेक्रॉप्सी) केली असता, जोरदार वाऱ्यामुळे हे टेरोसॉर तलावात कोसळले आणि लाटांमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

🦴 कोणत्या प्रजातीचे होते डायनासोर?
हे जीवाश्म टेरोडॅक्टिलस अँटिक्वस (Pterodactylus antiquus) या पहिल्या टेरोसॉर प्रजातीचे आहेत. यावरूनच पुढे “टेरोडॅक्टिल” हे नाव प्रचलित झाले. विशेष म्हणजे हे दोन्ही टेरोसॉर अतिशय लहान वयाचे होते. त्यांचा पंखांचा विस्तार फक्त ८ इंच (२० सेंटीमीटर) इतका होता, म्हणजेच जवळपास एका वटवाघळाएवढा.

🌀 वादळात मोठा जीवघेणा परिणाम
५ सप्टेंबर रोजी करंट बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, या वादळात अनेक लहान टेरोसॉर मरण पावले असावेत. प्रौढ टेरोडॅक्टिलसचा पंखांचा विस्तार ३.५ फूट (१.१ मीटर) इतका असल्याने ते अशा जोरदार वाऱ्यांना सामोरे जाऊ शकले असावेत.

📌 वैज्ञानिकांसाठी सुदैव, टेरोसॉरसाठी दुर्दैव
या दोन लहान टेरोसॉरना संशोधकांनी “लकी” आणि “लकी II” अशी टोपणनावे दिली आहेत. त्यांचा मृत्यू दुर्दैवी असला तरी त्यांचे नाजूक सांगाडे सापडणे हे वैज्ञानिकांच्या दृष्टीने मोठे भाग्य मानले जात आहे.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक रॅब स्माइथ म्हणाले – “टेरोसॉरची हाडे पोकळ आणि नाजूक असल्यामुळे त्यांचे जीवाश्म टिकणे अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे इतक्या स्पष्टपणे मृत्यूचे कारण सांगणारे जीवाश्म मिळणे म्हणजे खरोखर मोठा शोध आहे.”


🌍 विज्ञानातील मोठा शोध : १५ कोटी वर्षांपूर्वीच्या वादळात दोन उडणारे डायनासोर बळी
Total Views: 87