बातम्या
"लाडकी बहीण योजनेत मोठा फटका: 8 लाख महिलांना आता फक्त 500 रुपये
By nisha patil - 4/15/2025 4:11:35 PM
Share This News:
"लाडकी बहीण योजनेत मोठा फटका: 8 लाख महिलांना आता फक्त 500 रुपये
लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. याअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात होते. तसेच, विधानसभा निवडणुकीनंतर सरकार सत्तेवर परतल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले होते.
मात्र आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या साधारण 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये मिळणार आहेत. कारण या दोन्ही योजनांमधून मिळणाऱ्या रकमेचा एकूण मासिक लाभ 1500 रुपयांपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे लाखो महिलांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. अनेक महिला आता 1500 रुपये मिळण्याऐवजी केवळ 500 रुपयांवर समाधान मानावं लागणार आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
*शिवसेना (ठाकरे गट)*चे खासदार संजय राऊत म्हणाले, "लाडक्या बहिणींचा निधी आता 500 रुपयांवर आलाय, त्यांच्या मतांची किंमत शून्यावर आणली जातेय." तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघात करत म्हटलं, "केंद्राचे पैसे मिळतात म्हणून निधी कमी करणे चुकीचं आहे."
ऑक्टोबर 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 2.63 कोटी अर्ज आले होते. कागदपत्र पडताळणीनंतर ही संख्या 11 लाखांनी कमी होऊन 2.52 कोटी महिलांपर्यंत पोहोचली होती. मात्र आता या संख्येतील काही लाख महिलांना निधी कपात सहन करावी लागणार आहे.
महिला वर्गात निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
"लाडकी बहीण योजनेत मोठा फटका: 8 लाख महिलांना आता फक्त 500 रुपये
|