बातम्या

शासकीय जमिनीवरील घरांना मोठा दिलासा! ५०० चौ. फुटांपर्यंत नियमितीकरण मोफत

Big relief for houses on government land


By nisha patil - 11/18/2026 10:01:16 PM
Share This News:



शासकीय जमिनीवरील घरांना मोठा दिलासा! ५०० चौ. फुटांपर्यंत नियमितीकरण मोफत

 

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने नियमितीकरण योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेच्या अनुषंगाने शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील वारे वसाहत येथील तालीम हॉलमध्ये नागरिकांसाठी कागदपत्र पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेनुसार, १ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेली आणि केवळ निवासी वापरासाठी असलेली पात्र अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी जागेचे नियमितीकरण पूर्णपणे मोफत होणार आहे. तर ५०० ते १५०० चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी प्रचलित बाजारमूल्याच्या १० टक्के शुल्क आकारले जाणार आहे.

यासाठी मतदार यादीतील नोंद, महापालिका कर पावती, वीज बिल किंवा झोपडपट्टी सर्वेक्षण नोंद यांसारखे जुने पुरावे आवश्यक आहेत. तसेच मागील एक वर्षातील रहिवासाचा पुरावाही सादर करावा लागणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ असून, पात्र नागरिकांनी संबंधित महापालिका विभागीय किंवा वॉर्ड कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत, असे आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केले आहे.


शासकीय जमिनीवरील घरांना मोठा दिलासा! ५०० चौ. फुटांपर्यंत नियमितीकरण मोफत
Total Views: 10