बातम्या

बॉलीवूडला मोठा धक्का; दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन

Big shock to Bollywood


By nisha patil - 11/24/2025 4:05:17 PM
Share This News:



बॉलीवूडला मोठा धक्का; दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन

बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेता धर्मेंद्र यांनी आज जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसून उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. ८९ वर्षांचे धर्मेंद्र अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले. त्यांचा शेवटचा चित्रपटही पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

धर्मेंद्र यांनी अनेक दशकं हिंदी सिनेमावर अधिराज्य गाजवले. आपल्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने त्यांनी मोठी लोकप्रियता आणि कोट्यवधींची संपत्ती मिळवली. उपलब्ध माहितीनुसार, धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती सुमारे ४५० कोटी रुपये इतकी होती.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर धर्मेंद्र यांनी दोन विवाह केले होते. पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून त्यांना विजेता, अजिता, सनी आणि बॉबी अशी चार अपत्ये आहेत. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले, ज्यांच्यापासून ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत. विशेष म्हणजे, हे लग्न झाल्यावेळी प्रकाश कौर जिवंत होत्या आणि त्यांनी घटस्फोट घेतलेला नव्हता.

धर्मेंद्र खंडाळ्यातील आपल्या १०० एकरच्या आलिशान फार्महाऊसमध्ये राहत होते. अंदाजे १२० कोटी रुपयांच्या किमतीचे हे ठिकाण ते स्वतः फार जपून ठेवत. इथे ते शेतीही करत असत आणि त्याचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत. बॉबी देओलने एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांची आई प्रकाश कौरही धर्मेंद्र यांच्यासोबतच फार्महाऊसवर राहत होती आणि तिथेच दोघांना सर्वात जास्त शांतता वाटत असे.

धर्मेंद्र यांना गाड्यांचा विशेष शौक होता. मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, एसएल ५०० आणि रेंज रोव्हर अशा महागड्या कार्स त्यांच्या कलेक्शनमध्ये होत्या. पण त्यांची सर्वात लाडकी कार होती — तब्बल ६५ वर्ष जुनी फिएट, जिच्यावर त्यांचे अपार प्रेम होते.

धर्मेंद्र यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे योगदान, त्यांची साधेपणाची चाल आणि चाहत्यांवरील अपार प्रेम सदैव स्मरणात राहील.

 


बॉलीवूडला मोठा धक्का; दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन
Total Views: 23