बातम्या

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Biker killed on the spot after being hit by truck


By nisha patil - 11/17/2025 12:18:16 PM
Share This News:



गारगोटी : गारगोटी-कोल्हापूर महामार्गावर कूर (ता. भुदरगड) येथील कालव्यानजीक ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मितेश रवींद्र टेंबे (वय ४१, रा. राजारामपुरी १० वी गल्ली, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद गौरव सूर्यकांत कुलकर्णी यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दपारी

साडेबाराच्या सुमारास संजय राजाराम देसाई (रा. नाधवडे, ता. भुदरगड) हा ट्रक घेऊन मुदाळहून गारगोटीकडे जात होता. त्याचवेळी मितेश टेंबे हे त्यांच्या दुचाकीवरून कामानिमित्त गारगोटीकडे चालले होते. ते कूर येथील कालव्यालगतच्या राईस मिलजवळ आल्यावर भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील त्यांचा ताबा सुटला आणि ते ट्रकच्या चाकाखाली सापडले. ट्रक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टेंबे यांच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. भुदरगड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रक्तदान केले, पण स्वत:साठी मदत घ्यायला जीवच उरला नाही

एकुलते एक असलेले मितेश हे खासगी कंपनीत नोकरी करीत होते. कंपनीच्या कामानिमित्त गारगोटी परिसरात आले असता त्यांना आदमापूर येथे सकाळी रक्तदान शिबिर सुरू असल्याचे समजले. त्यामुळे बाराच्या सुमारास रक्तदान करून ते गारगोटीकडे जात होते. इतरांच्या जीवनासाठी रक्तदान करणाऱ्या या तरुणाच्या हातून रक्तदानाची पुण्याई घडली; परंतु नियतीने त्यांना स्वतःला रक्त चढविण्याचीही संधी मिळू दिली नाही.


ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
Total Views: 58