बातम्या
दत्तवाडात आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.......
By nisha patil - 10/27/2026 8:12:31 PM
Share This News:
दत्तवाडात आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.......
टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक; कोळी समाज बांधवांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती.....
दत्तवाड : प्रतिनिधी आचिन हेरवाडे.. संपूर्ण जगाला आदर्श जीवनमूल्यांची शिकवण देणाऱ्या रामायण महाकाव्याचे रचनाकार आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती दत्तवाड येथे मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
दत्तवाड येथील कोळी समाज बांधवांच्या वतीने वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीनुसार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. समाजातील प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज बांधव, भगिनी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत जयंती सोहळा पार पडला.
यानिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगाच्या गजरात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोळी समाज बांधव सहकुटुंब सहभागी झाले होते. तसेच सुहासिनींनी मंगल कलश धारण करून मिरवणुकीची शोभा वाढवली. भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
मूर्तीपूजनानंतर महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या आदर्श जीवनकार्यावर तसेच रामायण महाकाव्यातील विचार, संस्कार आणि जीवनमूल्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली आणि उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या जयंती सोहळ्यास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार, परिसरातील नागरिक, युवक, महिला आणि कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.परंपरा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम साधत दत्तवाडमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दत्तवाडात आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.......
|