बातम्या
सीपीआरमध्ये रक्ततपासणी रॅकेट उघड! डॉक्टर–लॅबचालकांची मिलीभगत; १४,४०० रुपये नातेवाइकांना परत
By nisha patil - 3/12/2025 4:14:51 PM
Share This News:
सीपीआरमध्ये रक्ततपासणी रॅकेट उघड! डॉक्टर–लॅबचालकांची मिलीभगत; १४,४०० रुपये नातेवाइकांना परत
कोल्हापूर सीपीआरमध्ये काही डॉक्टर आणि खासगी रक्ततपासणी लॅबचालक यांची गरीब रुग्णांच्या नातेवाइकांकडून बेकायदेशीर पैसे उकळण्याची धक्कादायक मिलीभगत उघड झाली आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी ठोस पुराव्यांसह हे रॅकेट उघड केल्यानंतर मंगळवारी लॅबचालकाने वसूल केलेले १४,४०० रुपये १५ नातेवाइकांना परत केले.
सीपीआरमध्ये खासगी लॅब येण्यास बंदी असतानाही काही लॅबचालक खुलेआम रुग्णांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत होते. एकाच शिफ्टमध्ये ५० हजार रुपयांची बेकायदेशीर वसुली होत असल्याचे समोर आले असून, दिवसाला ४ ते ५ लाखांची वरकमाई होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यातील ५० टक्के कमिशन डॉक्टर घेतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सीपीआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र खालच्या पातळीवर टाळाटाळ सुरू होती. अखेर रूपेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत नातेवाइकांना सीपीआर आवारात बोलावले व लॅबचालकाकडून रक्कम परत मिळवून दिली.
आता या रक्ततपासणी रॅकेटमधील डॉक्टर आणि संबंधितांवर सीपीआर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीपीआरमध्ये रक्ततपासणी रॅकेट उघड! डॉक्टर–लॅबचालकांची मिलीभगत; १४,४०० रुपये नातेवाइकांना परत
|