बातम्या
बोरपाडळे ग्रुपचा श्री जोतिबा चैत्र यात्रा पायी प्रवास यशस्वीपणे पूर्ण
By nisha patil - 4/17/2025 4:21:08 PM
Share This News:
बोरपाडळे ग्रुपचा श्री जोतिबा चैत्र यात्रा पायी प्रवास यशस्वीपणे पूर्ण
सुजित खडके यांची चप्पलविरहित परंपरा भाविकांचे आकर्षण ठरली
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा चैत्र यात्रा म्हणजे निष्ठा, परंपरा आणि भक्तीचा एक अविरत प्रवास. यंदाही बोरपाडळे गावातील 'बोरपाडळे ग्रुप' ने आपल्या २५ वर्षांच्या अखंड परंपरेला उजाळा देत पायी यात्रेचा खेटा यशस्वीपणे पार पाडला.
सुमारे ४५ ते ५० भाविकांनी बोरपाडळे ते जोतिबा आणि पुन्हा बोरपाडळे असा हा श्रमसंपन्न आणि भक्तीमय प्रवास साकारला.
यात्रेदरम्यान दानेवाडी येथील आंब्याच्या झाडाखालील विश्रांती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरते. या ठिकाणी के. पी. निकम यांचं दरवर्षी दुपारचं स्नान करणं ही एक अनोखी परंपरा असून, यंदाही ती जपली गेली.
यात्रेतील एक वेगळीच ओळख म्हणजे श्री. सुजित खडके. त्यांनी सलग अनेक वर्षांप्रमाणे यंदाही चप्पल न घालता, पायानंच हा तापदायक प्रवास पूर्ण केला. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले!" हे वर्णन त्यांच्या भक्तीच्या ठायी अगदी सार्थ ठरतं.
यात्रेच्या मार्गावर भाविकांच्या सेवेसाठी अनेकांनी आपला सहभाग नोंदवला.
श्री. लक्ष्मण कुंभार (मेजर साहेब) यांच्या वतीने गरमागरम वडापाव सेवा, तर सुरभी हॉटेलचे मालक श्री. संदीप कुंभार उर्फ पिंटू यांनी थंडगार वारणा लस्सी देऊन यात्रेकरूंना उष्णतेपासून दिलासा दिला.
आंबवडे येथील श्री. संभाजी आंबेकर व सौ. सुवर्णा आंबेकर यांच्या कडूनही सालाबादप्रमाणे थंडगार लिंबू सरबत सेवा देण्यात आली, ज्यामुळे वाटचाल अधिकच सुखद झाली.
ही यात्रा केवळ एक पायी प्रवास नसून, परंपरेचा, निष्ठेचा आणि सामुदायिक एकतेचा जीवंत अनुभव आहे, जो प्रत्येक वर्षी अधिक उजळत चालला आहे.
बोरपाडळे ग्रुपचा श्री जोतिबा चैत्र यात्रा पायी प्रवास यशस्वीपणे पूर्ण
|