बातम्या
उचगावमध्ये घरफोडी; १९ वर्षीय चोरटा जेरबंद!
By nisha patil - 10/31/2026 2:27:59 PM
Share This News:
उचगावमध्ये घरफोडी; १९ वर्षीय चोरटा जेरबंद!
घरात कोणी नसल्याची संधी साधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. अभिजित पंढरी वाडकर असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ३ लाख २५ हजार ६७० रुपये किमतीची सोन्याची चैन आणि अंगठी जप्त करण्यात आली आहे.
उचगाव येथील मणेरमळा परिसरात राहणाऱ्या वर्षा चौगुले यांच्या घरातून २० सप्टेंबर ते २० ऑक्टोबरदरम्यान सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात ३० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, अभिजित वाडकर हा मणेरमळा ते शिवराम पार्क रस्त्यावर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून अभिजित वाडकरला ताब्यात घेतले.
चौकशीत मित्राच्या मदतीने दागिने चोरल्याची कबुली अभिजित वाडकरने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत.
उचगावमध्ये घरफोडी; १९ वर्षीय चोरटा जेरबंद!
|