बातम्या

३.९५ लाखांची घरफोडी अन् १० तासांत पर्दाफाश; मैत्रीणचं निघाली चोर!

Burglary worth ₹3 95 lakh solved within 10 hours


By nisha patil - 9/23/2026 4:38:58 PM
Share This News:



३.९५ लाखांची घरफोडी अन् १० तासांत पर्दाफाश; मैत्रीणचं निघाली चोर!

जैनापूर (ता. शिरोळ) येथील चांदोली वसाहतीत झालेल्या ३ लाख ९५ हजार रुपयांच्या घरफोडीचा गुन्हे शोध पथकाने अवघ्या १० तासांत छडा लावला. या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली असून, फिर्यादीच्या बहिणीच्या मैत्रिणीनेच आपल्या चैनीच्या गरजा भागवण्यासाठी घरातून वेळोवेळी सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी तन्वी सुहास लेले वय २३, रा.छत्रपती संभाजीनगर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सुभाष रामचंद्र पवार रा. चांदोली वसाहत, जैनापूर यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या राहत्या घरातील कपाटातून ऑगस्ट २०२५ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

सोमवारी २१ सप्टेंबर या घटनेची जयसिंगपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित तरुणीपर्यंत मजल मारली. चौकशीत तिने स्वतःच्या चैनीच्या गरजा भागवण्यासाठी मैत्रिणीच्या घरातून वेळोवेळी सोने आणि रोकड चोरी केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी संशयित तरुणीला ताब्यात घेऊन चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.


३.९५ लाखांची घरफोडी अन् १० तासांत पर्दाफाश; मैत्रीणचं निघाली चोर!
Total Views: 10