बातम्या
शक्तीपीठ महामार्गाच्या ‘रावणा’चे दहन! राजू शेट्टींचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
By nisha patil - 10/21/2026 1:23:35 PM
Share This News:
शक्तीपीठ महामार्गाच्या ‘रावणा’चे दहन! राजू शेट्टींचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
दसऱ्यानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत नागेवाडी (ता. खानापूर) येथे शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतीकात्मक रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित केला. शेतकऱ्यांवर अन्याय करून गरज नसलेला महामार्ग उभारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, ६० हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दसऱ्याला रावण दहन करण्यामागे असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय हा संदेश असतो. रावण शक्तिशाली आणि विद्वान असूनही अहंकारामुळे त्याचा सर्वनाश झाला. माणूस कितीही मोठा असला, तरी चुकीचा मार्ग निवडल्यास त्याचा अंत निश्चित असतो, असा संदेश या प्रतीकात्मक दहनातून देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागेवाडी येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी आक्रमकपणे सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या ‘रावणा’चे दहन! राजू शेट्टींचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
|