बातम्या
सी. पी. आर. रुग्णालयाचे नूतनीकरण एप्रिलअखेर पूर्ण; १ मे रोजी लोकार्पणाची तयारी
By Administrator - 4/4/2026 3:58:18 PM
Share This News:
सी. पी. आर. रुग्णालयाचे नूतनीकरण एप्रिलअखेर पूर्ण; १ मे रोजी लोकार्पणाची तयारी
कोल्हापूर, दि. ३ : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सी. पी. आर.) येथील नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिलअखेर सर्व कामे पूर्ण करून १ मे महाराष्ट्रदिनी लोकार्पणासाठी सज्ज करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेंडा पार्क येथे सीपीआरसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विविध शासकीय संस्थांचा आढावा घेताना त्यांनी ही सूचना केली. सीपीआरमध्ये २०० कोटींहून अधिक निधीतून इमारती, यंत्रसामग्री व सेवासुविधांचे नूतनीकरण सुरू असून बहुतांश कामे पूर्णत्वास आली आहेत.
हेरिटेज मुख्य इमारतीचे मूळ सौंदर्य जपत नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, काँक्रीट रस्ते, नातेवाईकांसाठी निवारा शेड्स, बाह्यरुग्ण विभागाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
शेंडा पार्कमधील वैद्यकीय नगरीत प्रशासकीय इमारत, ऑडिटोरियम, ग्रंथालय, शवागार आदी सुविधा पूर्ण झाल्या असून ६०० बेड्सचे रुग्णालय, २५० बेड्सचे कॅन्सर रुग्णालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
कागल, सांगाव, पिंपळगाव खुर्द व उत्तुर येथील शासकीय वैद्यकीय संस्थांची कामेही प्रगतीपथावर असून पुढील दोन वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सी. पी. आर. रुग्णालयाचे नूतनीकरण एप्रिलअखेर पूर्ण; १ मे रोजी लोकार्पणाची तयारी
|