बातम्या

*धनगरमोळा येथे विविध शासकीय योजनांचे शिबिर उत्साहात संपन्न

Camp for various government schemes concludes


By nisha patil - 9/25/2026 11:48:16 PM
Share This News:



*धनगरमोळा येथे विविध शासकीय योजनांचे शिबिर उत्साहात संपन्न

*आदर्श कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
 

*आजरा(हसन तकीलदार): - आदर्श कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, धनगरमोळा यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून धनगरमोळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आजरा तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले.
                 

महसूल विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, पुरवठा विभागामार्फत डिजिटल रेशन कार्ड, तसेच अंत्योदय/इतर पात्र लाभार्थी योजनांची माहिती,पी. एम.किसान योजना, आधार कार्ड, आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ व मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच ‘लक्ष्मी’ योजनेअंतर्गत सात-बारा उताऱ्यावर महिलांची नावे मोफत नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष कॉ.प्रकाश मोरुस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत करून गणेशोत्सवानिमित्त मंडळाने राबविलेल्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. सन 1992 पासून मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिलांसाठी आरोग्य शिबिरे, शासकीय योजना मार्गदर्शन शिबिरे तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे त्यांनी सांगितले. याच सामाजिक कार्याचा पुढील टप्पा म्हणून तहसीलदार, आजरा यांच्या सहकार्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार समीर माने यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत वंचित, गरजू आणि गरीब नागरिकांसाठी कार्य करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी एकसंघपणे असे सामाजिक उपक्रम राबवावेत, त्यामुळे समाजात मंडळाच्या कार्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
 

तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते लाभार्थ्यांना डिजिटल रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड व गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. धनगरमोळा ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार नवीन गावठाणातील प्लॉटधारकांना स्वतंत्र सात-बारा उतारा व प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदारांनी दिली. तसेच शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रश्नही तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
 

गवसे आरोग्य विभागाच्या  डॉ. रुक्सार  यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना, उपलब्ध उपचारपद्धती तसेच नागरिकांनी आजार होण्यापूर्वीच आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास गवसे विभागाचे सर्कल अधिकारी प्रवीण खरात, पुरवठा निरीक्षक चव्हाण, संजय गांधी विभागाचे संतोष सांगळे, सुळेरान महसूल सहायक अधिकारी संतोष पाटील, गवसे महसूल विभागाच्या पाटील मॅडम, आरोग्य विभागाचे साबखान व त्यांचे सहकारी, तसेच मंडळाचे सचिव तुषार खरुडे, कार्याध्यक्ष संतोष  शेटगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरास धनगरमोळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच महिलावर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली व शिबिराचा लाभ घेतला.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व उपस्थितांचे मंडळाचे उपाध्यक्ष नामदेव जाधव यांनी आभार मानले.


*धनगरमोळा येथे विविध शासकीय योजनांचे शिबिर उत्साहात संपन्न
Total Views: 10