दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराला वेग
By nisha patil - 10/15/2026 11:08:39 PM
Share This News:
दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराला वेग
कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांशी थेट संवाद..
प्रतिनिधी | कोल्हापूर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराला वेग आला आहे. शिक्षकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर सावंत यांनी भर दिला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड परिसरातील विविध शाळांना त्यांनी भेटी दिल्या.
शिक्षक चळवळ टिकली पाहिजे. शिक्षकांसमोर आज अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षकांच्या समस्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील अडचणींची सखोल जाण असलेला अभ्यासू प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे आवश्यक आहे, अशी भूमिका माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी मांडली.यावेळी विविध शाळांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांची माहिती घेतली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी सावंत यांचे स्वागत केले. तसेच, त्यांनी मांडलेल्या शैक्षणिक चळवळीच्या भूमिकेला आपला पाठिंबा दिला.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षकांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि शैक्षणिक प्रश्नांवर संवाद साधणे, यावर त्यांच्या प्रचाराचा भर असल्याचे दिसून येत आहे.
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत त्यांच्या प्रचार यंत्रणेकडून संपर्क मोहिम राबवली जात आहे. विविध भागांतील शाळांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक चळवळीची भूमिका आणि शिक्षक प्रतिनिधित्व या मुद्द्यांभोवती पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार सुरू असून, आगामी काळात या निवडणुकीतील घडामोडींकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराला वेग
|