बातम्या
नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
By nisha patil - 1/8/2025 4:09:45 PM
Share This News:
नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर, : गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने, कायद्याच्या चौकटीत आणि पर्यावरणपूरक रीतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्यात समन्वय साधण्यात आला.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच राजर्षी छत्रपती शाहूंमहाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपला आहे. गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारे देखावे, ध्वनीमर्यादा पालन, लेझर व डॉल्बीपासून दूर राहणे आणि आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव साजरा होईल यासाठी मंडळांनी जबाबदारीने वागावे.”
'गणराया अवॉर्ड' पुन्हा सुरु – पोलीस अधीक्षक गुप्ता यांची माहिती
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले की, यावर्षीपासून ‘गणराया अवॉर्ड’ पुन्हा सुरु करण्यात येईल. त्यांनी स्पष्ट केले की, गणेश मूर्तीचा आकार, आवाजाची तीव्रता किंवा मंडपाचा भव्यपणा नव्हे, तर सुरक्षितता आणि शिस्तीचे पालन हेच खरी श्रद्धा दर्शवते. पारंपरिक वाद्यांचा वापर, सामाजिक संदेश असलेले देखावे आणि ध्वनीमर्यादेचे पालन ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महापालिका आणि जिल्हा परिषदेचे नियोजन
महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले की, पावसाच्या विश्रांतीनंतर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गांवर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठीही तयारी सुरु आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर’ या संदेशाला कृतीत उतरवून देशभर एक आदर्श निर्माण करूया, असे आवाहन केले.
आरोग्य तज्ज्ञांचा इशारा
सीपीआरचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना आणि ईएनटी तज्ज्ञ डॉ. संतोष कुलकर्णी यांनी मोठ्या आवाजाचे आरोग्यावर होणारे परिणाम सांगत ध्वनीमर्यादा पाळण्याचे आवाहन केले.
मंडळांची सकारात्मक भूमिका
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक, रस्त्यांची दुरुस्ती, विद्युत पुरवठा आणि मिरवणुकीत वेळेचे योग्य नियोजन यासारख्या सूचना दिल्या. सर्व मंडळांनी आदर्श गणेशोत्सवासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
|