बातम्या

“स्मृती मानधनाच्या विवाहसोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी

Celebrities flock to Smriti Mandhanas wedding


By nisha patil - 11/22/2025 4:06:29 PM
Share This News:



“स्मृती मानधनाच्या विवाहसोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी

 इस्लामपूरातील फार्महाऊस परिसरात कडेकोट बंदोबस्त”**

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि विश्वविजेती स्मृती मानधना उद्या, रविवार (दि. 23 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकत आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील सिने संगीतकार व निर्माता पलाश मुच्छल यांच्यासोबत तिचा विवाह सोहळा इस्लामपूर-सांगली रस्त्यावरील समडोळी येथील भव्य फार्महाऊसमध्ये पार पडणार असून वरपक्ष कालच दाखल झाला आहे.

शुक्रवारी रात्री भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपस्थितीत स्मृतीच्या मेहंदी समारंभाने उत्साहाचे रंग उधळले, तर आज हळदीचा पारंपरिक विधी मोठ्या जल्लोषात पार पडला. संपूर्ण पाच एकर परिसरातील फार्महाऊस नयनरम्य रोषणाईने उजळून निघाले आहे. प्रवेशद्वारावर हाताच्या स्कॅनिंगद्वारेच निमंत्रितांना आत प्रवेश दिला जात आहे. संपूर्ण सोहळ्यासाठी अतिशय मर्यादित व्यक्तींनाच आमंत्रण देण्यात आले आहे.

विवाहस्थळी उच्चमान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असल्याने तीन किलोमीटर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. उपअधीक्षक संदीप भागवत यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक पोलिसांची फौज तैनात असून वाहतूक शाखेच्या निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, बीसीसीआय अध्यक्ष जय शहा, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, व्ही.एस. लक्ष्मण, तसेच बॉलिवूड कलाकार जॅकी श्रॉफ, सोनू निगम यांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. तर विराट कोहली आणि अनुष्का शर्माही उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील आमदार-खासदार किंवा पालकमंत्र्यांना निमंत्रण नसल्याचेही कळते.

स्मृती मानधनाने विश्वचषक स्पर्धेत आपली दमदार फलंदाजी सादर करत शेफाली शर्मासोबत शतकी भागीदारी रचली. अंतिम सामन्यात 45 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारताने 297 धावांचा टप्पा गाठत विजेतेपद पटकावले.

गोपनीयतेत ठेवण्यात आलेला हा विवाहसोहळा क्रिकेट, राजकारण आणि मनोरंजनविश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीने उजळून निघणार आहे.


“स्मृती मानधनाच्या विवाहसोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी
Total Views: 45