राजकीय
जनगणना-२०२७ पूर्वचाचणीसाठी नागरिकांनी करावे सहकार्य : जनगणना संचालनालयाचे आवाहन
By nisha patil - 10/29/2025 11:47:04 AM
Share This News:
मुंबई, दि. २८ : भारत सरकारने २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू केली असून, या जनगणनेची पूर्वचाचणी देशभरात १० ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. या पूर्वचाचणीदरम्यान नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी भेट देऊन माहिती संकलन करतील. नागरिकांनी त्यांना आवश्यक ते सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जनगणना संचालनालय-महाराष्ट्र, मुंबईच्या संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी केले आहे.
जनगणना-२०२७ दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घर गणना जो एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडेल. दुसरा टप्पा लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल. ही जनगणना अधिनियम, १९४८ नुसार पार पाडली जाणार आहे.
पूर्वचाचणीदरम्यान जनगणनेच्या सर्व टप्प्यांची आणि प्रक्रियेची चाचणी घेण्यात येईल. या अंतर्गत स्व-गणनेचाही पर्याय उपलब्ध करण्यात आला असून, नागरिकांना १ ते ७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान स्व-गणना करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील पूर्वचाचणीसाठी तीन नमुना क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे — जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/वेस्ट प्रभागातील नमुना क्षेत्र. या भागांमध्ये जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू राहतील.
जनगणना संचालनालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या परिसरात जनगणनेचे प्रगणक आणि पर्यवेक्षक माहिती संकलनासाठी भेट देत असताना त्यांनी अचूक आणि संपूर्ण माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे.
जनगणना-२०२७ पूर्वचाचणीसाठी नागरिकांनी करावे सहकार्य : जनगणना संचालनालयाचे आवाहन
|