बातम्या

**चंदगड तालुक्यातील कळसगादे येथे वीज कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू मनाला चटका लावणारा*

Chandgad kalsgade


By nisha patil - 9/5/2026 9:59:32 PM
Share This News:



**चंदगड तालुक्यातील कळसगादे येथे वीज कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू मनाला चटका लावणारा*

*आजरा(हसन तकीलदार)*: चंदगड तालुक्यातील कळसगादे येथे शुक्रवारी सायंकाळी वळवाच्या पावसात वीज कोसळण्याच्या दुर्घटनेत साईराज ज्ञानेश्वर दळवी (वय 16) या शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.मनाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात विजांचा कडकडाटसह वळीव पाऊस सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी साईराज हा आपल्या वडिलांसोबत शेतात गेला होता. शेतातून जनावरे आणण्याचे काम सुरू असताना अचानक जोरदार कडकडाटासह वीज कोसळली आणि ती थेट साईराजच्या अंगावर पडली.

या भीषण घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेवेळी त्याच्या खिशात असलेला मोबाईलही पूर्णपणे जळून गेला. तसेच कमरेखालील दोन्ही पायांवर काळे डाग पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वीज शरीरातून गेल्याने गंभीर परिणाम झाल्याची चर्चा परिसरात होती.

घटनेनंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी साईराजला तातडीने चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे उत्तरीय परीक्षण करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

साईराज हा नववीत शिक्षण घेत होता. अत्यंत शांत, मनमिळावू आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. सकाळची शाळा करून दुपारी वडिलांना मदत करण्यासाठी तो शेतात गेला होता. मात्र नियतीने त्याच्यावर घाला घातल्याने कळसगादे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण आणि आजी असा परिवार आहे.


**चंदगड तालुक्यातील कळसगादे येथे वीज कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू मनाला चटका लावणारा*
Total Views: 755