ताज्या बातम्या
शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल-पेरणोली येथे प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी व्यापक बैठक
By nisha patil - 9/1/2026 2:48:18 PM
Share This News:
*आजरा(हसन तकीलदार):-
शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात मोठा बदल केला असून भुदरगड तालुक्यातून हा मार्ग आता आजरा तालुक्याच्या कोरिवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मसोली, खानापूर, पोळगाव, एरंडोळ वरून पुढे चंदगड तालुक्यातून बांद्याकडे जाणार आहे. या महमार्गामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी तर होणारच पण त्याचबरोबर कोरिवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी या शिवारातील पिकाऊ शेतजमीन मोठ्या प्रमाणात घेतली जाणार आहे. सोलापूर जिल्हयातून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दुष्काळी गावातून सांगली कोल्हापूर असा भुदरगड तालुक्यातून हा मार्ग आजरा, चंदगड मार्गे बांदा असा नेण्याचा घाट सरकारने घातला आहे.
या विभागातील कोणत्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना केवळ ठेकेदारांचे हितसंबंध सांभाळण्यासाठीच हा महामार्ग बनवला जाणार आहे. पर्यावरणाची हानी करणारा आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या या महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे असे म्हटले आहे.
खरंतर शक्तीपीठ महमार्गाची गरज नसताना तो शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जात आहे.या महामार्गामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून पुरासारख्या महाभयानक संकटाला इथल्या जनतेला वारंवार सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळं या महामार्गाला येथील शेतकऱ्यांचा आणि पर्यावरण वादी जनतेचा तीव्र विरोध आहे.
यापूर्वी आजरा येथे भरपावसात झालेल्या महामोर्चाने लोकांच्या मनात असलेला राग दाखवून दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी विरोध करतीलच पण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षात आम्ही कायम आघाडीवर राहणार आहोत. सरकारचा हा जनविरोधी, शेतकरी विरोधी, पर्यावरणाला बाधा आणणारा महामार्ग हाणून पाडू.या अनुषंगाने शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी ठीक ११.०० वाजता पेरणोली येथील रवळनाथ मंदिरात कार्यकर्त्यांची व्यापक बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई, सुधीर देसाई, तानाजी देसाई, अमरसिंग पवार, आनंदराव कुंभार, राजू होलम, युवराज पोवार, युवराज जाधव, मारुती पाटील यांनी केले आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल-पेरणोली येथे प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी व्यापक बैठक
|