बातम्या
छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रेक: पन्हाळा–पावनखिंड मार्गावर ११६० छात्रांची शौर्यपदभ्रमंती
By nisha patil - 11/22/2025 3:31:39 PM
Share This News:
छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रेक: पन्हाळा–पावनखिंड मार्गावर ११६० छात्रांची शौर्यपदभ्रमंती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा इतिहास अनुभवत शौर्याची प्रेरणा देणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रेक’ किंवा पन्हाळा–पावनखिंड पदभ्रमंती मोहीम २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान भव्यदिव्य स्वरूपात होत आहे. राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत देशभरातील १२ राज्यांमधील ११६० हून अधिक छात्र सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेत माहिती देताना एनसीसीचे कोल्हापूर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी सांगितले की, यानंतरचे छात्र शिबिर ४ डिसेंबरपर्यंत चालणार असून, सात दिवस छात्रांना सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पन्हाळागड–पावनखिंड–विशाळगड हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आणि शौर्याने नटलेला परिसर आहे. येथील ऐतिहासिक लढाई, भौगोलिक खडतरता, स्थानिक संस्कृती यांचा प्रत्यक्ष अनुभव देत छात्रांच्या अंगी शौर्य, शिस्त आणि एकात्मतेची भावना विकसित करण्याचा मुख्य उद्देश आहे.
या मोहिमेत २६० छात्रांच्या प्रत्येकी अशा चार मुलांच्या तुकड्या आणि एक मुलींची तुकडी सहभागी होणार आहे. पदभ्रमंतीदरम्यान तीन प्रमुख मुक्काम ठेवण्यात आले आहेत—पन्हाळा ते बांबवडे, मलकापूर आणि पावनखिंड ते गजापूर असा प्रवास निश्चित करण्यात आला आहे.
मोहिमेला मेजर जनरल विवेक त्यागी उपस्थित राहणार असून, खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पदभ्रमंतीचा शुभारंभ होईल.
एनसीसी हा भारतीय संरक्षण विभागाच्या मान्यतेने चालणारा उपक्रम असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांनी दिली. शाळा–महाविद्यालयातील प्रशिक्षित एनसीसी शिक्षकांकडून दिले जाणारे प्रशिक्षण छात्रांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह सैन्यदलातील संधींसाठी मार्ग मोकळा करते, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रेक: पन्हाळा–पावनखिंड मार्गावर ११६० छात्रांची शौर्यपदभ्रमंती
|