बातम्या
कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
By Administrator - 2/19/2026 3:03:38 PM
Share This News:
कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
मंत्री हसन मुश्रीफ व राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला जलाभिषेक व दुग्धाभिषेक
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य जगभरात वाखाणण्याजोगे -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कागल, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती केवळ तलवारीच्या बळावर नव्हे तर लोकांच्या विश्वासाच्या आणि न्यायाच्या आधारे. त्यांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून कारभार केला. शेतकरी, महिला, सर्वसामान्य प्रजा यांचा सन्मान राखणारा राजा म्हणून त्यांची ओळख होती. जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य वाखाणण्याजोगेच आहे, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले .
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कागल शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास मंत्री हसन मुश्रीफ व छत्रपती शाहू समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. याचबरोबर पालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .
मंत्री मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही दोघे फार मोठ्या उत्साहात साजरी करत होतो. याचा ताण प्रशासनावर यायचा. पण आता जिल्ह्यांमध्ये आदर्श अशी युती आपली झाली आहे. ही युती होताना अनेक चांगले निर्णय घेतलेले होते, त्यामध्ये शिवजयंती संयुक्त करण्याचा निर्णय आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, कागलमध्ये संयुक्त शिवजयंती साजरी होतेय याचा आपल्याला अभिमान आहे. केडीसीसी बँक व राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने एकत्र येऊन तरुण तरुणींना उद्योजक बनवून पुढील शिवजयंती आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची गरज आहे. कागल शहरात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा लकरच बसवू. शहरात "शाहूसृष्टी" व्हावी अशी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांची इच्छा होती. ती येत्या काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया.
प्रा. पवन पाटील म्हणाले, प्रत्येकाच्या मनामनात घराघरात शिवचरित्र पोहोचले आहे. प्रत्येक घरात देवदेवतांचे फोटो, मुर्त्या आहेत. याचबरोबर घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एखादा फोटो आहे का, याचा विचार करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमी महिलांचा सन्मान केला. कारखान्याला सरसेनापती संताजी घोरपडे यांचे नाव देण्याचे धाडस फक्त कागलमध्येच होवू शकते. सर्वांनी शिवचरित्र वाचणे गरजेचे आहे .
■ मंत्री मुश्रीफ यांची शेरोशायरी . . .
□ राजे तुम्ही होतात म्हणून फुलली इथली माती....
तुम्ही होतात म्हणून जपली जिवाभावाची नाती....
राजे तुम्ही होतात म्हणून कणगीत होती कणसं....
तुम्ही होतात म्हणून जीवाला जीव देत होती माणसं....!
□ छत्रपती ने वो कहानी सच्चाई बना डाली....
डर को जिसने दिल से मिटा दिया.....
अन्याय के सामने सिर न झुका दिया.......
वो नाम है हिम्मत की पहचान........
छत्रपती ने हर युवा को जगा दिया......!
कार्यक्रमास तहसीलदार अमरदीप वाकडे, नगराध्यक्षा सौ. सविता माने, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, दिपक मगर, प्रविण काळबर, संजय चितारी, सतीश घाडगे, सौरभ पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत उपनगराध्यक्ष जयवंत रावण, प्रास्ताविक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. आभार अमित पिष्टे यांनी मानले.
कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
|