बातम्या

तालुक्यात अमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करून टोळ्यांचा बिमोड करा-पोलीस स्टेशनला निवेदन

Cirme news ajra1


By nisha patil - 9/4/2026 3:13:24 PM
Share This News:



**तालुक्यात अमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करून टोळ्यांचा बिमोड करा-पोलीस स्टेशनला निवेदन*

*आजरा( हसन तकीलदार)* : तालुक्यात तरुण व मुलांमध्ये बेशिस्त व बेजबाबदार वागण्याचे प्रकार तसेच अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई व्हावी व यामध्ये सहभागी टोळ्यांचा शोध घेत त्यांचा बीमोड करण्याबाबतच्या आशयाचे निवेदन आजरा उप पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,आजरा शहराची सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील परंपरा आजतागायत आदर्श व वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. तथापि, मागील आठवड्यात शहरामध्ये घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे किरकोळ वादातून दोन जिवलग मित्रांमध्ये झालेला खून - ही संपूर्ण घटना शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. सदर अरोपीना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी विनंती असून सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे. शहरात व तालुक्यात अमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाला लागण्याचा धोका बळावत चालला आहे. अमली पदार्थांचे सेवन व त्यांची अवैध विक्री ही कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असून समाजाच्या आरोग्याला व सुरक्षिततेला गंभीर धोका आहे.

त्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करून त्यांना अशा व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष मोहिमा घेतल्या जाव्यात तसेच आजरा शहर व तालुक्यात अमली पदार्थाच्या विक्री व वितरण करणाऱ्यावर कठोर कारवाई करणेत यावी. अशा अवैध कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांचा बिमोड करणेत यावा. तरुणांमध्ये जनजागृती करून त्यांना अशा व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविणेत यावी. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेत याव्यात.

आपण या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशा आशयाच्या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी अबीटकर, संबंधित वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि आजरा पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

यावेळी नगरसेवक परशुराम बामणे(भाऊजी),नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार (परळकर), रेश्मा बुडडेखान,नगरसेवक अभिषेक शिंपी, निसार लाडजी, आसिफ सोनेखान, असिफ पटेल तसेच सामाजिक कार्यकर्ते नौशाद बुड्डेखान व राजू विभूते आदीनी सहभाग घेतला.


तालुक्यात अमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करून टोळ्यांचा बिमोड करा-पोलीस स्टेशनला निवेदन
Total Views: 307