विशेष बातम्या
महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरात सिटीझन फोरमची आमदार क्षीरसागर यांच्याशी बैठक
By nisha patil - 11/5/2025 12:12:06 AM
Share This News:
महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरात सिटीझन फोरमची आमदार क्षीरसागर यांच्याशी बैठक
कोल्हापूर, ता. १० : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वारंवार होणाऱ्या महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
२०१९ व २०२१ साहित दरवर्षी महापुरामुळे शेती, उद्योग, नागरी व व्यापारी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून याला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचे विविध अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अलमट्टीसह इतर कारणांवर कायमस्वरूपी उपायांची गरज असल्याचे सिटीझन फोरमने नमूद केले.
या बैठकीत पंचगंगा, कृष्णा व इतर नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, गाळ उपसा, राधानगरीच्या दरवाजांमुळे होणाऱ्या जलप्रवाह नियमन, तसेच राधानगरी ते कोल्हापूरदरम्यान बंधारे उभारणे आणि त्यांच्या उंची वाढविणे याबाबत चर्चा झाली. कोल्हापुरातील जयंती व दुधाळी नद्यांच्या साफसफाईसह त्यांच्या पात्राचे खोलीकरण व रुंदीकरणाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. यासोबत महामार्गाच्या भरावामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांबाबत सुद्धा उपाययोजना सुचविण्यात आल्या.
या कामांसाठी आवश्यक निधी मित्रा संस्थेच्या माध्यमातून मिळविण्याचे आश्वासन आमदार क्षीरसागर यांनी दिले. येत्या ३-४ वर्षात टप्प्याटप्प्याने या उपाययोजना पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर महापुराचा धोका कायमस्वरूपी कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र-कर्नाटक सरकारमधील समन्वयामुळे पंचगंगेचा पूर टळल्याचे यावेळी नमूद झाले. यावर्षी सुद्धा त्रिस्तरीय सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याबाबत प्रशासकीय व न्यायालयीन स्तरावर विरोध करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. लवकरच यासंदर्भात मुंबईत खात्यांची बैठक आयोजित होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
या वेळी सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव, मनसेचे राजू जाधव, प्रकाश सरनाईक, वैभवराज राजेभोसले, राजेंद्र थोरवडे, किशोर घाडगे, गौरव लांडगे, राजेंद्र चव्हाण, महादेव आयरेकर, निवास ब्रह्मपुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरात सिटीझन फोरमची आमदार क्षीरसागर यांच्याशी बैठक
|