बातम्या
गोखले कॉलेजमधील दुर्घटनेप्रकरणी महावितरणकडून स्पष्टीकरण
By nisha patil - 9/25/2026 7:45:43 PM
Share This News:
गोखले कॉलेजमधील दुर्घटनेप्रकरणी महावितरणकडून स्पष्टीकरण
मिरवणुकीपूर्वी आवश्यक कामे व दुरुस्त्या पूर्ण केल्याचा महावितरणचा दावा; शहरात २१ पथके, २४
अभियंते आणि २२५ कर्मचारी तैनात
कोल्हापूर : गोखले कॉलेज परिसरात आज मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपली बाजू स्पष्ट केली आहे. सदर घटनेत महावितरणचा कोणताही दोष अथवा निष्काळजीपणा नसल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.
मिरवणुकीपूर्वी मुख्य मिरवणूक मार्गावरील महावितरणशी संबंधित आवश्यक कामे तसेच पोलिस प्रशासनाकडून सूचित करण्यात आलेली कामे आणि आवश्यक दुरुस्त्या यापूर्वीच पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
आजच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महावितरणची २१ पथके, २४ अभियंते आणि २२५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान आवश्यक ती मदत आणि विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणचे कर्मचारी विविध ठिकाणी उपस्थित होते, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, वाय. पी. पोवार नगर मंडळाची मूर्ती मंडळापासून गोखले कॉलेजपर्यंत आणताना महावितरणच्या पथकाने सुरुवातीपासूनच आवश्यक सहकार्य केले, असा दावा महावितरणने केला आहे. मूर्तीच्या मिरवणुकीसोबत महावितरणच्या उद्यमनगर शाखेतील जनमित्र स्वप्नील जाधव, दीपक थोरवत, सूरज चव्हाण आणि दिग्विजय जांभळे उपस्थित असल्याचे महावितरणने नमूद केले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुर्घटनेपूर्वीच मूर्ती एका बाजूस झुकलेली असल्याचे समजते. मात्र, घटनेचे नेमके कारण संबंधित यंत्रणांच्या तपासणीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या घटनेचे वृत्तांकन करताना महावितरणची बाजूही प्रसिद्ध करण्यात यावी, अशी विनंती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी, कोल्हापूर यांनी केली आहे.
गोखले कॉलेजमधील दुर्घटनेप्रकरणी महावितरणकडून स्पष्टीकरण
|