बातम्या
अभिजात मराठी, अभिमान मराठी; शिवाजी विद्यापीठात रंगला मराठीचा जल्लोष!
By nisha patil - 6/10/2026 7:33:58 PM
Share This News:
अभिजात मराठी, अभिमान मराठी; शिवाजी विद्यापीठात रंगला मराठीचा जल्लोष!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठात मायमराठीच्या गौरवाचा सुरेल आणि सांस्कृतिक सोहळा रंगला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह-२०२६’ अंतर्गत ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या सांगितिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि जल्लोषी प्रतिसाद मिळाला. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या. मराठी भाषेच्या विविध बोलींमध्ये कोल्हापूरची मराठी वैशिष्ट्यपूर्ण असून तिचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. कामत यांनीही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा विद्यापीठाला अभिमान असल्याचे सांगत भविष्यातही मराठीच्या गौरवासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील, असे स्पष्ट केले.
कोल्हापूरचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध गायक बंधू डॉ. अभिजीत कोसंबी आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी आपल्या बहारदार गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. भक्तीगीतांपासून वासुदेव गीतांपर्यंत, आदिवासी गीतांपासून चित्रपट गीतांपर्यंत विविध गीतांचे सादरीकरण करत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. यासोबतच मंगळागौर, लावणी, आदिवासी नृत्य, गोविंदा आणि कोळीनृत्य अशा विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. दिगंबर नाईक यांच्या नेटके संयोजनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाला विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिजात मराठी, अभिमान मराठी; शिवाजी विद्यापीठात रंगला मराठीचा जल्लोष!
|