बातम्या

नवरात्रोत्सवासाठी स्वच्छ कोल्हापूर; अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

Clean Kolhapur for Navratri Festival


By nisha patil - 7/10/2026 11:11:36 PM
Share This News:



नवरात्रोत्सवासाठी स्वच्छ कोल्हापूर; अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या नवरात्रोत्सवाचा आनंद आणि पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत झालेल्या या मोहिमेत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि नगरसेवक आदिल फरास यांनी स्वतः सहभाग घेत मंदिर परिसरात स्वच्छता केली.

महालक्ष्मी मंदिर परिसर, रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणांची कसून स्वच्छता करण्यात आली. यावेळी ३ ट्रॉली आणि २ टिप्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कचरा व कटिंगचा उठाव करण्यात आला. टेंबलाई मंदिर परिसर, रंकाळा परिसर, डी-मार्टसमोरील रस्ता, प्रभाग क्रमांक ५ मधील खानविलकर पंप ते महावीर कॉलेज, सेवा रुग्णालय ते सर्किट हाऊस, पितळी गणपती ते डीएसपी चौक मेन रोड तसेच प्रभाग क्रमांक १८ मधील सायबर चौक ते शेंडा पार्क मेन रोड या प्रमुख ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने विशेष नियोजन केले आहे. सहायक आयुक्त स्वाती दुधाने, उपशहर अभियंता सुरेश पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोग्य निरीक्षक विनोद नाईक, मनोज लोट, अनिकेत सूर्यवंशी, सुरज घुणकीकर, आदित्य पवार, भूमी कदम यांच्यासह मुकादम आणि मनपा कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. नवरात्रोत्सवात कोल्हापूर शहराची स्वच्छता आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनीही कचरा न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


नवरात्रोत्सवासाठी स्वच्छ कोल्हापूर; अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम
Total Views: 7