बातम्या

पुणे शिक्षक मतदारसंघात गावडे-सावंत यांच्यात काट्याची टक्कर; आजगावकर पिछाडीवर!

Close contest between Gawade and Sawant in the Pune Teachers


By nisha patil - 10/27/2026 8:19:59 PM
Share This News:



पुणे शिक्षक मतदारसंघात गावडे-सावंत यांच्यात काट्याची टक्कर; आजगावकर पिछाडीवर!

 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही मतदारसंघांत चुरशीची लढत पाहायला मिळत असून, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणे समोर येत आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर असून, त्यांना अपक्ष उमेदवार दत्ता सावंत यांचे कडवे आव्हान मिळत आहे. सचिन सानप तिसऱ्या क्रमांकावर असून, विद्यमान आमदार जयंत आजगावकर पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. वैध आणि अवैध मतांचे वर्गीकरण पूर्ण झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा निश्चित होणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या पुढील टप्प्यांत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये हर्षदा देशमुख आघाडीवर असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष मतमोजणीच्या पुढील टप्प्यांमध्ये ही आघाडी कायम राहते की निकालाचे चित्र बदलते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी जसजशी पुढे सरकेल, तसतसे निकालाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत अखेर विजयाचा गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


पुणे शिक्षक मतदारसंघात गावडे-सावंत यांच्यात काट्याची टक्कर; आजगावकर पिछाडीवर!
Total Views: 40