बातम्या
भारतीय सामाजिक रचनेचे आकलनासाठी कॉ. शरद पाटील यांचे योगदान अधोरेखित
By nisha patil - 11/9/2025 3:18:51 PM
Share This News:
भारतीय सामाजिक रचनेचे आकलनासाठी कॉ. शरद पाटील यांचे योगदान अधोरेखित
कोल्हापूर, दि. १० सप्टेंबर – भारतीय सामाजिक रचनेचे यथायोग्य आकलन करण्यासाठी कॉ. शरद पाटील यांनी नवे प्रमाणशास्त्र विकसित केले, असे प्रतिपादन महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सरोज पाटील (माई) यांनी केले.
कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि सत्यशोधक प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांचे स्त्रीदास्य व जातीदास्य विषयक चर्चाविश्व’ या विषयावर चर्चासत्र विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात पार पडले.
सरोज पाटील (माई) म्हणाल्या, “कॉ. शरद पाटील हे प्राच्यविद्यापंडित तसेच कृतीशील सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी कम्युनिस्ट चळवळीत राहून आदिवासी, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी लढे उभारले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांच्या गुणवत्तेचे आणि बुद्धीमत्तेचे पैलू पाडावेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “शिस्त आणि आईच्या कडकपणामुळे आमच्या भावंडांनी आपापल्या क्षेत्रात कर्तबगार कामगिरी केली आहे. वडिलांच्या पाठबळामुळे आईची सामाजिक वाटचाल शक्य झाली.”
सत्यशोधक प्रबोधन ट्रस्ट, पुणे येथील प्रा. प्रतिमा परदेशी यांनी मनोगतात सांगितले की, “महाराष्ट्राच्या साहित्य व संस्कृतीच्या चळवळीत कॉ. शरद पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी इतिहास, संस्कृती, समाजकारण व अर्थशास्त्र या क्षेत्रात प्रभावी लेखन केले.”
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. उर्मिला दशवंत यांनी केले तर आभार डॉ. नेहा वाडेकर यांनी मानले. प्राचार्य टी.एस. पाटील, गौतमीपुत्र कांबळे, डॉ. निर्मला जाधव, सचिन गरूड, किशोर धमाले, डॉ. रणधीर शिंदे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय सामाजिक रचनेचे आकलनासाठी कॉ. शरद पाटील यांचे योगदान अधोरेखित
|