बातम्या
रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘लाखाच्या... कोटीच्या गप्पा’ रंगतदार सादरीकरण
By nisha patil - 8/20/2025 2:41:19 PM
Share This News:
रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘लाखाच्या... कोटीच्या गप्पा’ रंगतदार सादरीकरण
शिक्षण म्हणजे फक्त पाठांतर नव्हे तर जीवनाशी जोडलेला अनुभव. हाच धडा कोरगांवकर हायस्कूल, कोल्हापूरने श्री शाहू रेल्वे टर्मिनसवर दाखवून दिला. दुपारच्या गजबजलेल्या फलाटावर इयत्ता आठवीचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी वसंत जोशी लिखित ‘लाखाच्या... कोटीच्या गप्पा’ हा धडा प्रवाशांसमोर प्रत्यक्ष अभिनयातून सादर केला.
.%5B1%5D.jpg)
शिक्षक सदाशिव हाटवळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रेल्वे डब्यातील प्रवासी बनून संवाद सादर केले. कुणी अप्पर तर कुणी लोअर बर्थ पकडून बसले आणि जणू प्रत्यक्ष रेल्वे प्रवासाचाच अनुभव निर्माण झाला.
यातील सर्वात लक्षवेधी प्रसंग ठरला तो शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्या नाटकातील ‘पिशवीत रक्कम आहे’ असा गैरसमज होऊन घडणारी चोरी आणि त्यातून निर्माण होणारी प्रवाशांची धांदल. विद्यार्थ्यांनी हा प्रसंग विनोदी फार्सिकल शैलीत सादर केल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शेवटी उलगडा झाल्यावर झालेली गंमत आणि त्यातून मिळणारा संदेशही प्रेक्षकांच्या मनात ठसला.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी रेल्वे प्रशासनाची परवानगी मिळवून दिली. रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रेल्वेची इत्यंभूत माहितीही पुरवली. त्यामुळे साहित्य, नाट्य, वास्तव आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा सुंदर संगम साधला गेला.
शालेय समितीच्या अध्यक्षा सुचेता कोरगांवकर व सचिव एम.एस. पाटोळे यांनी शाळेच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. शिक्षक सदाशिव हाटवळ, मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि कलाशिक्षक नागेश हंकारे यांच्या प्रयत्नांची शैक्षणिक वर्तुळात दखल घेतली जात आहे.
आजच्या स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्थेत अशा जीवनाशी निगडित उपक्रमांची नितांत गरज आहे. कारण वर्गखोलीबाहेर मिळणारे हे अनुभवच विद्यार्थ्यांना खरी समज आणि जीवनमूल्यांची जाण देतात.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘लाखाच्या... कोटीच्या गप्पा’ रंगतदार सादरीकरण
|