राजकीय
अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड पास देणार, बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई - आयुक्त डॉ.राजेद्र भारुड
By nisha patil - 8/5/2026 4:59:44 PM
Share This News:
अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड पास देणार, बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई - आयुक्त डॉ.राजेद्र भारुड
शहरातील फेरीवाल्यांच्या व्यवस्थापनाबाबत महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली असून अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोडयुक्त पास देण्यात येणार आहे. तर नोंदणी नसलेल्या व अनधिकृत फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले. यासंदर्भातील आढावा बैठक आज सायंकाळी आयुक्त कार्यालयात पार पडली. बैठकीत शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी, त्यांची संख्या तसेच प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या फेरीवाल्यांची माहिती घेण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहरात सन २०१९ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ५ हजार ६३० फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये विभागीय कार्यालय क्र. १ अंतर्गत ८९६, विभागीय कार्यालय क्र. २ अंतर्गत २ हजार ६८४, विभागीय कार्यालय क्र. ३ अंतर्गत १ हजार ११०, तर विभागीय कार्यालय क्र. ४ अंतर्गत ९४० फेरीवाल्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी आयुक्त डॉ. भारुड यांनी नोंदणीकृत फेरीवाल्यांव्यतिरिक्त इतर सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. अधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेकडून विशेष पास देण्यात येणार असून त्यावर क्यूआर कोड असणार आहे. या कोडमध्ये संबंधित गाडीची संपूर्ण माहिती, ठिकाण, परवान्याचा कालावधी आदी माहिती उपलब्ध राहणार आहे. अतिक्रमण विभागाकडून क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित फेरीवाला अधिकृत आहे की अनधिकृत, याची तत्काळ पडताळणी करता येणार आहे. हा पास दरवर्षी नूतनीकरण करावा लागणार आहे. तसेच ज्या ठिकाणी विनापरवाना फेरीवाले आढळतील त्यांच्यावर विभागीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. नो-हॉकर्स झोनमध्ये एकही गाडी उभी राहू नये, याची दक्षता घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. महापालिकेचे अनेक प्रश्न विभागीय कार्यालय स्तरावरच निकाली निघावेत, यासाठी सर्व सहाय्यक आयुक्तांना अतिरिक्त अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आयुक्त डॉ. भारुड यांनी सांगितले.
यावेळी यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रफुल्ल कांबळे, उपस्थित होते.
अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड पास देणार, बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई - आयुक्त डॉ.राजेद्र भारुड
|